नगर–मनमाड महामार्गावरून रोज हजारो वाहने धावत असतात. परंतु अलीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रोटोकॉलच्या नावाखाली ठिकठिकाणी असलेले गतिरोधक काढून टाकल्याने या मार्गाचे ‘महामार्ग’ हे नाव आता ‘मृत्यूमार्ग’ ठरत आहे, अशी तीव्र टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा सरचिटणीस रणजित बोठे पाटील व ऍड. रामनाथ सदाफळ पाटील यांनी केली आहे.
त्यांनी सांगितले की, “शाळांच्या परिसरात असलेले गतिरोधक काढून टाकणे म्हणजे निष्काळजी प्रशासनाची जनतेच्या जीवाशी खेळण्याची भूमिका आहे. देशाच्या सहकार मंत्र्यांच्या प्रोटोकॉलसाठी जनतेचे प्राण धोक्यात टाकले जात आहेत, हे अमानवीय आहे. प्रशासन झोपेतून उठून तात्काळ महामार्गावरील कामे पूर्ण करावी आणि गर्दीच्या ठिकाणी गतिरोधक टाकावेत, असा इशारा त्यांनी दिला.
गेल्या दोन दिवसांपूर्वी ‘गॉडफादर’ या वृत्तवाहिनीने या गंभीर प्रश्नाचा ऊहापोह केल्यानंतर नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली. विशेषतः पी.जे.एस.एस. स्कूल, शारदा विद्या मंदिर आणि प्रीतीसुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांच्या आसपास दररोज लहान मुले, पालक आणि वृद्ध नागरिकांना रस्ता पार करणे जीवावर बेतत आहे.
सामाजिक कार्यकर्ते ऍड. रामनाथ सदाफळ पाटील यांनी याबाबत प्रशासनावर ताशेरे ओढताना म्हटले की, प्रोटोकॉलच्या नावाखाली जर नागरिकांच्या सुरक्षेची हत्या होत असेल, तर आम्ही मौन धरणार नाही. एकही जीव गेला तर त्याची नैतिक जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल.
बोठे पाटील आणि सदाफळ पाटील यांनी राहाता सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन त्वरित गतिरोधक टाकण्याची मागणी केली आहे. अन्यथा जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, आणि तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला.
या वेळी अभिजित बोठे, बाळासाहेब गुळवे, निलेश डांगे, प्रशांत गायकवाड यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न दुर्लक्षित केल्यास पुढील जबाबदारी प्रशासनावर राहील, असा एकमुखी इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!