राहाता नगरपरिषदेच्या निकालाने केवळ सत्तेचा ताबा बदललेला नाही, तर शहराच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात एक ठळक, न बोलता दिलेला संदेश उमटवला आहे राजकारणात घाईने साजरे केलेले विजय कधी कधी महागात पडतात! या निकालाकडे पाहताना श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आठवण टाळता येत नाही. त्या निवडणुकीत विरोधकांनी विखे परिवारावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा करत १६ उमेदवार निवडून आणले, तर विखे पाटलांच्या गोटातून केवळ एकच उमेदवार विजयी झाला.
त्या निकालानंतर “विखे पाटलांचे राजकारण संपले” अशा घोषणा, आत्मविश्वास आणि गर्वाची भाषा सुरू झाली. मात्र, राहाता नगरपरिषद निकालाने हे सर्व गैरसमज मतपेटीतूनच साफ केले. २० नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष एकूण २१ जागांपैकी तब्बल २० उमेदवार विखे पाटलांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे विजयी झाले, तर विरोधकांच्या वाट्याला केवळ एकच जागा आली. हा योगायोग नव्हे, तर नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन राजकीय उत्तर होते.
या संपूर्ण चित्राचा केंद्रबिंदू एकच सुजय दादा विखे पाटील. शांत, संयमी, कमी बोलणारे; पण योग्य वेळी अचूक चाल खेळणारे. ना गाजावाजा, ना व्यक्तिगत टीका फक्त बूथनिहाय गणित, योग्य उमेदवारांची निवड, कार्यकर्त्यांवर घट्ट पकड आणि मतदारांच्या मनोवृत्तीचा अचूक अंदाज. हीच खरी विखे शैली आहे, जी विरोधकांना कधीच समजली नाही.
अहिल्यानगर जिल्हा आणि विशेषतः शिर्डी मतदारसंघात सुजय दादा विखे पाटील यांना ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जाते, ते उगाच नाही. जिथे ते ताकद लावतात, तिथे सत्ता आकार घेते; आणि जिथे ते दुर्लक्ष करतात, तिथे राजकीय अस्तित्वच प्रश्नात येते, हे वास्तव राहाता निकालाने पुन्हा सिद्ध केले.
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत “डोके लावल्याचा” दावा करणाऱ्यांची अवस्था आज अशी झाली आहे की विधानसभा असो वा नगरपरिषद प्रत्येक पातळीवर त्यांची नावेच निकालातून गायब झाली आहेत. सुजय दादांनी कोणताही गदारोळ न करता, कोणालाही थेट लक्ष्य न करता संपूर्ण विरोधी राजकारणालाच सुपडासाप केल्याचे चित्र स्पष्ट दिसते.
आज राहाता नगरपरिषदेत विरोधकांकडे उरले आहे ते फक्त “आपण कुठे चुकलो?” हा प्रश्न, आणि सुजय दादा विखे पाटलांकडे आहे पूर्ण सत्ता, पूर्ण नियंत्रण आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी मोकळे मैदान. हा निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेचा विजय नाही, तर “संयम, नियोजन आणि वेळेवर दिलेले उत्तर हेच खरे राजकारण” याचा जिवंत दाखला आहे.
म्हणूनच राहाता नगरपरिषद निकाल हा विजय नाही; तो श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणाचा वचपा, आणि विखे परिवाराच्या राजकीय ताकदीचा ठसठशीत पुनरुच्चार आहे.