काही स्वप्ने अशी असतात की ती डोळ्यांनी नाही, तर काळजाने पाहिली जातात. आणि काही वडील असे असतात की, आपला श्वास थांबला तरी मुलाच्या विजयावरचा विश्वास थांबत नाही, राहाता शहरासाठी हा धक्का देणारा, भावनांनी गलबलून टाकणारा क्षण ठरला. आपल्या मुलाच्या विजयाचे स्वप्न हृदयात घट्ट धरून, निकालाच्या अवघ्या दोन दिवस आधी रफिक (बाबा) शाह यांनी या जगाचा निरोप घेतला. संपूर्ण शहराला पोरके करून गेलेल्या बाबांनी मात्र जाताना एक अपूर्ण स्वप्न मागे ठेवले नाही ते स्वप्न आज स्वर्गातून पूर्ण होताना पाहत आहेत.
मुन्नाभाई शाह यांना विखे पाटलांकडून उमेदवारी जाहीर झाली, तो क्षण रफिक बाबांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा होता. “माझ्या मुलाला संधी मिळाली” हे शब्द बाबांच्या डोळ्यात आणि छातीतल्या समाधानातून स्पष्ट दिसत होते. त्या दिवसापासून ते केवळ वडील राहिले नाहीत, तर प्रचाराचे सर्वांत उत्साही कार्यकर्ते बनले. वय, तब्येत, थकवा काहीच त्यांच्या आड आले नाही. प्रचारात ते इतके ओघून गेले की जणू बाबांनी स्वतःला पुन्हा तरुण करून घेतले होते. गल्ली-गल्लीत, माणसा-माणसात ते एकच वाक्य बोलत होते “माझा मुलगा जिंकेल”
पण नियतीने एक वेगळाच डाव टाकला. विजयाचा क्षण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याआधीच बाबांनी डोळे मिटले. मात्र त्यांचा विश्वास, त्यांचे स्वप्न, त्यांचा आशीर्वाद हे सर्व मुन्नाभाई शाह यांच्या पाठीशी अजूनही ठामपणे उभे आहेत.
आज शहरात जेव्हा नगरपरिषद निकालाकडे पाहिले जाते, तेव्हा प्रत्येक मतात, प्रत्येक घोषणेत, प्रत्येक आनंदाच्या क्षणात रफिक (बाबा) शाह यांची आठवण दाटून येते. हा केवळ एका उमेदवाराचा विजय नाही, तर एका बाबाच्या अपार विश्वासाचा विजय आहे. बाबा गेले पण त्यांचे स्वप्न आजही जिवंत आहे. आणि तो विजय, स्वर्गातून पाहणाऱ्या बाबांसाठीच आहे.