राहाता शहर आणि परिसरात आज सायंकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही तासांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले असून, काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळही आले. हवामान विभागाने जारी केलेल्या ऑरेंज अलर्टनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अशा पावसाची शक्यता व्यक्त केली होती, आणि राहाता परिसरातही याचा पूर्ण परिणाम जाणवला. पावसाच्या जोरामुळे राहाता शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि वसाहतींमध्ये पाणी साचले आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून, वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, पावसासह आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. महावितरण कंपनीने सांगितले की, दुरुस्तीचे काम सुरू आहे.
राहाता तालुका हा शेतीप्रधान असल्याने या पावसाचा शेतकऱ्यांवर खूप मोठा परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे काही शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.” जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत राहाता आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. २८ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने आपत्कालीन मदत केंद्रे सुरू केली असून, हेल्पलाइन क्रमांक १०७७ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.