ADCC बँकेत घुले अध्यक्ष राजकारणात नवेच पालटलेले समीकरण! अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त चेअरमनपदासाठी सोमवारी दि. २४ ला पार पडलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक संपन्न झाली.
यापूर्वी सकाळी ९ वाजता अहिल्यानगर मधील राज पॅलेस येथे संचालकांची अनौपचारिक चहापान बैठक पार पडली. याच बैठकीत अध्यक्षपदासाठी घुले यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अधिकृत बैठकीतही त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
विखें पाटलांचा पडद्यामागील प्रभाव ठळक! या निवडीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पडद्यामागील हालचाली निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. घुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे असल्याने, काळे-विखे यांच्यातील सुसंवाद आणि नव्याने जुळलेला राजकीय समन्वय हा या समीकरणातील महत्त्वाचा घटक मानला जात आहे. विखेंनी केलेल्या या “मास्टरस्ट्रोक” मुळे जिल्ह्यातील भविष्यातील राजकारणात नवे वळण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मतदानाधिकार असलेल्या संचालकांची यादी! मोनिका राजळे, आण्णासाहेब म्हस्के, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, आशा तापकीर, भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अनुराधा नागवडे, अमित भांगरे, गीतांजली शेळके, माधवराव कानवडे, करण ससाणे, गणपतराव सांगळे आणि शंकरराव गडाख असे एकूण सदस्य या प्रक्रियेत सहभागी होते.
निवड प्रक्रियेपूर्वीच बहुसंख्य संचालक आगामी राजकीय समीकरणांचा विचार करून विखे पाटलांशी सलोखा राखणे गरजेचे असल्याच्या मतावर होते. त्यामुळे घुले यांच्या समर्थनाची लाट बैठकीपूर्वीच स्पष्ट झाली होती.
घुले यांची प्रतिक्रिया! बिनविरोध निवडीनंतर आ. चंद्रशेखर घुले यांनी संचालक मंडळाचे आभार मानत विश्वास दर्शविल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करून आगामी काळात सहकारी क्षेत्राला नवा दिशादर्शक अध्याय देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.