राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीत मंगळवारी शहराने ज्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर आता संपूर्ण राजकीय परिसरात केवळ एकच शब्द घुमतो आहे “निकाल”!
२ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी ५.३० वाजता अधिकृत वेळ संपला असला, तरी मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या मतदारांमुळे मशीन रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिली. शहराने ज्या प्रमाणात सहभाग नोंदवला, ते पाहता जनता आता केवळ प्रेक्षक राहण्याच्या मूडमध्ये नसल्याचे स्पष्ट होते.
यंदा एकूण ७७.८७ टक्के मतदान नोंदवले गेले. पुरुष मतदार: ७,८१६. महिला मतदार: ७,३४१. एकूण मतदान: १५,१५७. ही आकडेवारी इतकी प्रभावी आहे की मतपेटीत बंदिस्त झालेले भविष्य आता उमेदवारांची धडकी भरवत आहे.
२०१६ ची मतदानाची पार्श्वभूमी यंदाच्या टक्केवारीतला सूचक बदल!
२०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीत राहात्यात तब्बल ८५% एवढी विक्रमी मतदान टक्केवारी नोंदवली गेली होती. त्या तुलनेत यंदाची टक्केवारी जवळपास ७.१३% नी कमी आहे. मतदानातील हा घसरणारा कल अनेक राजकीय समीकरणांना नवे प्रश्न विचारतो. शहरातील मतदारांचा उत्साह कायम असला तरी काही भागांमध्ये दिसलेली अस्वस्थता, अंतर्गत नाराजी, उमेदवारांच्या बदललेल्या प्रतिमाभानाची समीकरणे, तसेच पक्षीय गटबाजीमुळे निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण याचा परिणाम मतदानाच्या एकूण आकडेवारीवर झाल्याचे स्पष्ट दिसते.
२०१६ मधील प्रचंड मतदान हे परिवर्तनाची लाट मानले गेले होते; यंदाची तुलनेने कमी टक्केवारी कोणत्या पक्षासाठी इशारा आहे आणि कोणासाठी सुखद संधी? हे चित्र २१ डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे.
मूळत: ३ डिसेंबरला जाहीर होणारी मतमोजणी आता २१ डिसेंबरला पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयाने संपूर्ण राजकीय गणिताचे सूरच बदलले. उमेदवारांचे हृदयाचे ठोके वाढलेच, पण सर्वसामान्य जनतेतही “नेमके कोण बाजी मारणार?” या प्रश्नाची उत्सुकता टोकाला पोहोचली आहे.
दरम्यान, पक्षांतर्गत समीकरणे, गटबाजी, प्रचारातील मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील नाराजी-समाधान या सर्वांचा नेमका फटका कुणाला बसला आणि फायद्याची शाल कुणाच्या गळ्यात पडली? याचा अंतिम निकाल आता २१ डिसेंबरलाच उलगडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!