राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीत सध्या एकच वादळ उठले आहे तुषार सदाफळ, सुनिताभाभी टाक, सलीम शाह, राजेंद्र पाळंदे, वसंत खरात, इरफान शेख, महेश भालेराव हे विखे पाटलांचे कट्टर समर्थक म्हणवणारे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात अचानक बंडखोरी करून मैदानात कसे उतरले?
कालपर्यंत विखे पाटलांशिवाय राजकारणच नाही, विखे पाटिल आमचे सर्वस्व, विखे पाटिल आमचे देव म्हणणारे हे चेहरे १७ नोव्हेंबरनंतर सेकंदात तंबू काढून विरोधात कसे उभे राहिले, यानेच जनतेच्या मनात गंभीर प्रश्नांची मालिका पेटली.
शहरात आता चर्चेचा एकच मुद्दा ही खेळी नेमकी कोणाची? हे सर्व एका धाग्याने संचलित होतंय का? मागे कुणाचा मोठा हात आहे? राहात्याच्या राजकारणात ‘अदृश्य शक्ती’ काम करतेय का, असा संशय नागरिकांनी उघडपणे व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाचं म्हणजे हे सर्व उमेदवार तोंडाने आजही म्हणतात, “आम्ही विखे पाटलांचेच आहोत निष्ठा तशीच आहे!” मग प्रश्न आणखी धारदार होतो निष्ठा जपणारे विरोधात का? महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग अडवण्यामागे कोणती राजनीतिक रचना आहे?
राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीत या बंडखोरीमुळे अनेक कोढी निर्माण झाली आहेत, ही व्यक्तिगत नाराजी आहे की आखलेला राजकीय कट? हे उमेदवार स्वतःच्या दमावर उतरलेत की कुणाच्या छुप्या पाठिंब्यावर? यामागील खरा अजेंडा कोणाचा?
जनतेला आज हे कोढं जरी सुटत नसलं तरी, मतदानाच्या दिवशी हेच कोढं मतदार सोडवतील, अशी चर्चा चहूबाजूंनी ऐकू येत आहे.
आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न या बंडखोरीचा फायदा नेमका कोणाला? आणि प्रहार सर्वात जास्त कोणावर होणार? याचे स्पष्ट उत्तर आगामी दिवसच देणार आहेत आणि राहाता नगरपरिषदेची रणधूमाळी आणखी तीव्र करणार हे नक्की!