नगरमनमाड महामार्ग — नावात ‘महामार्ग’, पण वास्तवात मात्र खड्ड्यांचा महासागर! या रस्त्याने कित्येकांचे संसार उद्ध्वस्त केले, कित्येकांच्या संसाराचे दिवे विझवले. रोजचा प्रवास आता जीवावरचा झाला आहे. पण शासन मात्र कानावर हात ठेवून झोपलंय.
अशा वेळी माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी या रस्त्यावरच, पावसाच्या साचलेल्या पाण्यात, अक्षरशः खड्ड्यात बसून आंदोलन करत सरकारला जागवण्याचा प्रयत्न केला. हा फक्त आंदोलनाचा प्रकार नव्हता — तो होता एका जनप्रतिनिधीचा आक्रोश, एका आईचा आर्त हाकारा आणि हजारो प्रवाशांच्या व्यथांचा आवाज.
काही आठवड्यांपूर्वी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचा दौरा झाला होता. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ते प्रवरानगरला गाडीनं गेले, पण तिथून पुढे कोपरगावचा प्रवास हेलिकॉप्टरनेच झाला. कारण स्पष्ट होतं — नगरमनमाड रोडवरील खड्डे आणि असह्य परिस्थिती! त्या वेळी नागरिकांच्या मुखात एकच वाक्य होतं — “मंत्रिजी, तुम्ही रोज या रस्त्याने या, मगच सुधारणा होईल!”
या महामार्गाने आतापर्यंत शेकडो जीव घेतलेत. प्रत्येक अपघातानंतर काही दिवस घोषणा, आश्वासनं, आणि पुन्हा शांतता! प्रशासनाची उदासीनता इतकी की लोकांचा संयमही आता संपतोय.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही हात जोडून या रस्त्याबाबत असहाय्यता व्यक्त केली — पण प्रश्न तोच: या रस्त्यात नक्की दडलंय तरी काय? भ्रष्टाचार? अकार्यक्षमता? की लोकांच्या जिवाची किंमतच कमी आहे सरकारसाठी?
आज प्रश्न फक्त माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी विचारलेला नाही — तो प्रत्येक प्रवाशाचा, प्रत्येक नागरिकाचा आहे. “आता किती बळी घ्याल, सरकार? खड्डे बुजवणार की लोकशाहीच त्यात पुरणार?”
हा रस्ता नाही, हे सरकारच्या उदासीनतेचं प्रतीक झालं आहे. पावसाच्या पाण्यात बसलेली ती माजी आमदार म्हणजे आजच्या काळातली जनतेची जिवंत प्रतिमा — जी विचारते आहे: “शासन जागं आहे का अजूनही निद्रेतच?”