राहुरी – नगर – पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनाने अहमदनगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. केवळ ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील एक सक्षम, लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कालच आमदार कर्डिले हे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते. दोघांमध्ये आपुलकीच्या गप्पा, एकत्र भोजन आणि विविध विषयांवरील चर्चा झाल्यानंतर केवळ काही तासांतच त्यांच्या निधनाची बातमी समोर आली, ही बाब अधिकच हृदयद्रावक ठरली.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, ही वार्ता हृदय पिळवटून टाकणारी आहे. अजूनही विश्वास बसत नाही की कर्डिले साहेब आता आपल्यात नाहीत. कालच आम्ही एकत्र होतो, आणि आज त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे.
ते पुढे म्हणाले, कर्डिले साहेबांशी आमचे मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहेत. विखे आणि कर्डिले परिवार दशकानुदशके एकत्र राहिले आहेत. राजकारणात आम्ही नेहमी खांद्याला खांदा लावून काम केले. माझ्या दृष्टीने ते अहिल्यानगर जिल्ह्याचे एक राजकीय गुरु होते. त्यांच्या जाण्याने केवळ आम्हीच नव्हे, तर संपूर्ण महायुती आणि भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे.
शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या दीर्घ सार्वजनिक जीवनात सहकार, शेती, शिक्षण आणि विकास क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं. अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन, राज्याचे राज्यमंत्री आणि जनतेचे खरे हितचिंतक म्हणून त्यांनी लोकांशी थेट नाळ जोडली होती. साधेपणा, लोकाभिमुख कार्यशैली आणि प्रामाणिक सेवाभाव या गुणांनी त्यांचं व्यक्तिमत्त्व जनमानसात अढळ स्थान मिळवून गेलं.
त्यांच्या निधनाने केवळ एक जननेता हरपला नाही, तर जनसेवेची एक सुवर्ण परंपरा खंडित झाली आहे.
त्यांचे आदर्श आणि कार्यशैली हीच आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांची वाटचाल पुढे नेणं हेच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केली.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास लाभो, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.