विजयादशमीच्या निमित्ताने राहाता शहरात अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. २ ऑक्टोबर, गुरुवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील जुनी गढी येथे रामलीला नाटिका आणि भव्य रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी खासदार व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राहाता ग्रामस्थ आणि शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ३० कलाकारांचा समावेश असलेली रामलीला नाटिका सादर होईल. यामध्ये श्री रामांचा वनवास, सीता हरण, हनुमान-सिता भेट, लक्ष्मण मूर्च्छा आणि रावण वध यासारखे प्रसंग प्रत्यक्ष अनुभवता येतील. यावर्षी माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राहाता ग्रामस्थ आणि शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळाने सर्व नागरिकांना, विशेषतः पुरुष आणि महिला भगिनींना, या भव्य रामलीला नाटिका आणि रावण दहन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. राहाता शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता आहे.