अतिवृष्टीमुळे राहाता शहरातील अनेक भाग जलमय झाले असताना माजी नगराध्यक्ष कैलास बाप्पू सदाफळ यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून संकटग्रस्त नागरिकांसाठी मोठा आधार दिला आहे. त्यांनी नाम. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेवरून, राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक चौधरी आणि संतोष रोकडे यांच्यासह अथक परिश्रम करत पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा दिला.
अतिवृष्टीमुळे बनकर वस्तीवरील चार कुटुंबांचे संसार पाण्यात गेले. या कुटुंबांना तातडीने गिधाड वस्तीवर स्थलांतरित करण्यात आले. तसेच, साई कॉलनीतील चार घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पत्री पूलालगतच्या आदिवासी वस्तीवरील आठ कुटुंबे, म्हणजेच एकूण ३० नागरिकांना चितळी रोड येथील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आले. या सर्वांसाठी जेवण आणि राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे, या नागरिकांना लहान मुले, मुली आणि इतरांसाठी नवीन ड्रेस आणि कपड्यांचे वाटपही करण्यात आले.
गांगुर्डे गल्लीमध्ये कात नदीच्या पुरामुळे पाणी घरांमध्ये शिरले होते. येथे नगरपरिषदेच्या यंत्रणेद्वारे पाणी उपसण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. तसेच, पिपंळवाडी रोडवरील शेतकऱ्यांच्या शेतीत साचलेले पाणी समंजसपणे काढून त्यांना दिलासा देण्यात आला. भिमराज निकाळे वस्ती आणि बोरावके बंगला, चितळी रोडसमोरील खड्ड्यांमध्ये साचलेले पावसाचे पाणी काढण्यासाठी मोटारपंप आणि वीज कनेक्शनद्वारे पाणी १४ चारीत पाइपलाइनच्या माध्यमातून काढण्याचे काम सध्या सुरू आहे.
पत्री पूलालगतच्या आदिवासी वस्तीवर पाणी काढून, मुरूम टाकून रस्ता तयार करण्यात आला. यामुळे या भागातील नागरिकांना ये-जा करणे सोयीचे झाले. साईनगर, श्रीरामनगर आणि रांजणगाव रोड परिसरातील पावसाचे पाणी जेसीबीच्या साहाय्याने ओढ्यात वळवण्यात आले. या सर्व कामांमुळे पूरग्रस्त भागातील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे.
कैलास बाप्पू सदाफळ यांनी यापूर्वीही संकटकाळी नागरिकांसाठी मोठे योगदान दिले आहे. २०१२ साली राहाता शहरात भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळी शहरातील विहिरी आटल्या होत्या आणि पिण्याच्या पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नव्हता. अशा कठीण परिस्थितीत सदाफळ यांनी शासनाकडून मिळालेल्या २० हजार लिटरचे ५ टँकर, खाजगी ५ टँकर आणि ८ हजार लिटरचे ४ भाडोत्री टँकरद्वारे दररोज २ लाख लिटर पाणी स्वतःच्या शिंगावे येथील शेतातील बोरवेल विहिरीतून विनामूल्य उपलब्ध करून दिले. यामुळे राहाता शहरातील नागरिकांना नगरपरिषदेच्या नळाद्वारे आठवड्यातून एकदा पाणी मिळाले.
कैलास बाप्पू सदाफळ यांनी अतिवृष्टीच्या या संकटकाळातही आपल्या नेतृत्वाने आणि सामाजिक बांधिलकीने नागरिकांना आधार दिला आहे. त्यांच्या या कार्यामुळे राहाता शहरातील पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचे कौतुक होत आहे. संकटकाळात त्यांनी दाखवलेली तत्परता आणि मदतीचा हात पुढे करणारी वृत्ती खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.