शिर्डी-कोपरगाव मतदारसंघात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याची लगबग सुरू होती. स्वागताचे बॅनर, फुलांचे तोरण, राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांची लगबग — सगळीकडे उत्साह ओसंडून वाहत होता. परंतु या उत्साहाच्या छायेत एक वेगळी, पण अत्यंत जिव्हाळ्याची चर्चा नागरिकांमध्ये पेटली होती — “मंत्रिजी, तुम्ही रोज या…!”
कारण काय माहित आहे का? ज्या नगर-मनमाड रोडवरून सामान्य नागरिक रोज आपल्या गाडीतून धक्के खात, पाठीचे मनके सैल करत प्रवास करतो, ज्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होतात, त्या रस्त्याची आज अचानक डागडुजी झाली. अनधिकृत गतिरोधक एका रात्रीत गायब झाले. खड्डे बुजवले गेले. डांबराचा गंध हवेत दरवळू लागला. हे पाहून लोकांच्या मनात उद्विग्न हास्य उमटलं – “आपल्याला वाचवायला मंत्री लागतात का?”
प्रत्येक सामान्य नागरिकाचा प्रश्न आज एकच आहे — आपल्या जीवाची किंमत फक्त मंत्र्यांच्या दौऱ्यापुरतीच का? दररोज हजारो प्रवासी या मार्गाने जातात, अपघात होतात, पण तेव्हा प्रशासनाला काळजी नसते. मग आजच का ही धावपळ? आजच का ही झटापट? मंत्री महोदय येणार म्हणून अचानक जागे झालेल्या यंत्रणेकडे लोकांनी कटाक्ष टाकला आणि तोंडातून शब्द निघाले — “मंत्रिजी, तुम्ही रोज या…!”
विशेष म्हणजे ज्या मार्गाने अमित शाह शिर्डीहून प्रवरानगर, लोणी मार्गाने जाणार होते, तोच मार्ग फुलासारखा गुळगुळीत करण्यात आला. स्वागताच्या जयघोषात ही व्यथा जरी दडली असली, तरी सामान्य जनतेच्या अंतःकरणात प्रश्नांचा जळता निखारा कायम राहिला — आपल्या जीवाचे मोल राजकीय दौऱ्यांच्या निमित्तानेच का जागे होते?
आज शिर्डी-कोपरगाव परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच भावना दाटून आली — “मंत्रिजी, तुम्ही रोज या, म्हणजे तरी आमचे रस्ते रोज दुरुस्त होतील, आमचे जीव सुरक्षित राहतील, आणि आम्हालाही एक दिवस नागरिक म्हणून किंमत मिळेल.