कोपरगाव–शिर्डी मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा खदखदू लागलं आहे! केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या स्वागताची जय्यत तयारी दोन्ही घराण्यांनी केली होती — विखे पाटिल परिवार आणि कोल्हे परिवार. पण स्वागताच्या गजरात राजकीय सूर पुन्हा विस्कटले!
५ ऑक्टोबरच्या या उच्चस्तरीय दौर्यासाठी दोन्ही कुटुंबांनी जिल्हाभर जोरदार प्रचार मोहीम राबवली. वृत्तपत्रं, स्थानिक यूट्यूब चॅनेल, विविध वृत्त वाहिण्या आणि शहरभर झळकणारे भव्य बॅनर या सगळ्यांनी मंत्री अमित शाहांच्या आगमनाला उत्सवाचं स्वरूप दिलं होतं. पण या चकाकीमागे एका जुन्या वादाचा पुन्हा ठिणगा पेटला — कोल्हे परिवाराचे नाव विखें पाटलांच्या निमंत्रण पत्रिकेत नसल्याने राजकीय खदखद उफाळली!
त्यातच प्रत्युत्तर म्हणून, कोल्हे परिवाराने मंत्री विखे पाटलांचे नाव निमंत्रण पत्रिकेत शेवटी टाकून, प्रोटोकॉलच्या नावाखाली आपली नाराजी स्पष्ट दाखवली. यातूनच, जुनं शीतयुद्ध पुन्हा तापलं — “विखे विरुद्ध कोल्हे” या राजकीय द्वंद्वाची नवी आवृत्ती लोकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
नगर जिल्ह्यात या दोन्ही घराण्यांचा प्रभाव प्रचंड. कधीकाळी एकाच पक्षाच्या छत्राखाली असलेले हे दोन गट आता भाजपच्या राजकीय पटावर एकाच तंबूत असले तरी अंतर्गत स्पर्धा थांबत नाही. विखे पाटलांच्या हातून गणेश सहकारी साखर कारखाना कोल्हे-थोरात गटाने घेतला, तर नगरदक्षिण लोकसभा लढतीत सुजय विखे पाटिल यांच्या विरोधात विवेक कोल्हे आणि बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंके यांना विजयी केलं, अशी नागरिकांमधील चर्चा आजही संपलेली नाही.
आता मंत्री अमित शाहांच्या दौऱ्याच्या निमित्ताने दोन्ही गट पुन्हा सज्ज — पण आतल्या आत चीड कायम! राजकारणात यालाच म्हणतात, “हातात हार, पण मनात वार!”
याहून रंजक बाब म्हणजे, मंत्री अमित शाहांच्या दौऱ्यानंतर शिर्डी साईबाबा संस्थान आणि विधानपरिषदेत सुजय विखे पाटिल व कोल्हे परिवाराची पुनर्वसनाची चर्चा रंगत आहे. प्रश्न इतकाच — कोणाचं पुनर्वसन होणार? आणि कोणाच्या पुनर्वसनात कोण रोडा ठरणार?
या दोन्ही नेत्यांचा वाद अखेर थांबेल का? की भाजपसाठीच हा अंतर्गत संघर्ष भविष्यातील डोकेदुखी ठरेल? हे ठरवण्यासाठी आता सगळ्यांच्या नजरा एका व्यक्तीकडे — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीकडे लागल्या आहेत!
राजकारणात मैत्री क्षणभंगुर आणि स्पर्धा चिरंतन — विखे पाटिल परिवार आणि कोल्हे परिवार यांचं नातं याच वाक्याचं जिवंत उदाहरण आहे!