डॉ. किसनराव गाडेकर हे नाव आज राहाता शहरापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या प्रामाणिक सेवाभावाचे प्रतीक बनले आहे. चार दशकांहून अधिक काळ वैद्यकीय सेवा, समाजकारण आणि शहर विकासाच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेला विश्वास आजही हजारो नागरिकांच्या मनात अढळ आहे.
१९८३ साली राहाता शहरातील तेली गल्लीमध्ये एका छोट्याशा दवाखान्यापासून सुरू झालेला हा प्रवास केवळ व्यवसायाचा नव्हता, तर तो गोरगरीबांच्या वेदनांशी जोडलेल्या संवेदनशील सेवाभावाचा होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कठोर परिश्रम, जिद्द आणि रुग्णांप्रती असलेली आत्मीयता यांच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
त्यानंतर १९८९ साली पिंपळस रोड परिसरात स्वतःचा भव्य दवाखाना उभारून त्यांनी राहाता शहराच्या आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय लिहिला. या दवाखान्याचे उद्घाटन परमपूज्य सती गोदावरी माताजी यांच्या हस्ते झाले, ही त्या कार्याला लाभलेली आध्यात्मिक पावतीच मानली जाते.
डॉ. गाडेकर यांच्या दवाखान्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे ‘जटिल परिस्थितीतही नैसर्गिक प्रसूती करण्याचा प्रयत्न.’ आधुनिक काळात व्यापारीकरणाच्या छायेत वैद्यकीय क्षेत्राची संवेदनशीलता हरवत चालल्याची चर्चा होत असताना, डॉ. गाडेकर यांनी मात्र रुग्णसेवेलाच आपला धर्म मानले. माफक दरात उपचार, गरीब रुग्णांप्रती असलेली आपुलकी आणि प्रत्येक रुग्णाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे दिलेला आधार यामुळे पंचक्रोशीत त्यांचे नाव विश्वासाने घेतले जाते.
१९९४ साली वैद्यकीय व्यावसायिकांना एकत्र करत त्यांनी धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. ही केवळ आर्थिक संस्था नव्हती, तर अनेकांना आर्थिक आधार देत स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देणारे सामाजिक व्यासपीठ होते. समाजातील सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेली ही भूमिका त्यांच्या व्यापक सामाजिक दृष्टीकोनाची साक्ष देते.
१९९६ साली राहाता नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी शहर विकासाला नवी दिशा दिली. रस्ते, नागरी सुविधा, विकासकामे आणि शहराच्या जडणघडणीत त्यांनी केलेली कामे आजही नागरिकांच्या स्मरणात आहेत. सत्तेचा वापर प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर समाजहितासाठी कसा करावा याचे उदाहरण त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले.
२००० साली गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी श्री साईबाबा सेवा मंडळाच्या माध्यमातून अनुदानित हायस्कूल सुरू करून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोलाची भर घातली. गरीब कुटुंबातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, हा त्यामागील उद्देश होता. समाजातील वंचित घटकांच्या भविष्याला आकार देण्याचे कार्य त्यांनी निःशब्दपणे सुरू ठेवले.
डॉ. गाडेकर यांचे संपूर्ण कुटुंबच सेवाभाव, वैद्यकीय क्षेत्र आणि समाजकारणाशी घट्ट जोडलेले आहे. स्वतः डॉक्टर, सहचारिणी डॉ. मंगला गाडेकर या डॉक्टर आणि माजी नगरसेविका, तर मुलगा नगराध्यक्ष, डॉ. स्वाधीन गाडेकर व सून डॉ. निर्मला गाडेकर याही वैद्यकीय सेवेत कार्यरत अशा प्रकारे हे कुटुंब समाजसेवा, आरोग्यसेवा आणि लोककारण यांचा सुंदर संगम ठरले आहे. दोन नगराध्यक्ष एक माजी-एक आजी, डॉक्टरकी आणि सामाजिक बांधिलकी यामुळे गाडेकर कुटुंबाची राहाता शहरात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
२० मे रोजी डॉ. किसनराव गाडेकर यांच्या पार पडलेल्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, व्यापारी, प्रशासकीय तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला. ज्येष्ठांपासून श्रेष्ठांपर्यंत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक स्तरातून व्यक्त झालेला स्नेह हा त्यांच्या आयुष्यभराच्या प्रामाणिक कार्याचीच पोचपावती मानली जात आहे.
आजच्या स्वार्थी आणि दिखाऊ युगात संघर्षातून उभे राहत समाजासाठी आयुष्य वाहणारी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत. अशा काळात डॉ. किसनराव गाडेकर यांचा प्रवास हा केवळ एका डॉक्टरचा इतिहास नाही, तर तो संघर्ष, सेवा, संवेदना आणि समाजनिष्ठ नेतृत्वाचा प्रेरणादायी आदर्श आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!