राहाता :
कल्याण येथे बौद्ध भिक्कू संघावर झालेला हल्ला, बुद्ध भूमी जमीनदोस केल्याची घटना व भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र मूर्तीचा अवमान झाल्याच्या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले असून, या घटनेविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आक्रमक झाली आहे. पक्षाचे उत्तरनगर जिल्हा युवक अध्यक्ष प्रदीप (पप्पू) पोपटराव बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली राहाता पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक दिपक सरोदे यांना निवेदन देऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख ही महापुरुषांच्या विचारांवर उभी आहे. अशा परिस्थितीत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची विटंबना व बौद्ध भिक्कू संघावर झालेला हल्ला ही केवळ एका समाजाच्या श्रद्धेवर झालेला आघात नसून संपूर्ण मानवतावादी विचारसरणीवर झालेला हल्ला आहे. या घटनेमुळे बौद्ध समाजासह सर्व आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून दोषींविरोधात तातडीने आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की, अशा घटनांमुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करावेत, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, महापुरुषांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. राज्य शासन आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणात संवेदनशीलता दाखवत न्याय्य भूमिका घ्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनामुळे कल्याण येथील घटनेविषयीचा निषेध आणखी तीव्र झाला असून, समाजातील विविध घटकांकडूनही दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
महापुरुषांचा अपमान म्हणजे समाजाच्या अस्मितेवर घाव आहे भगवान गौतम बुद्ध हे शांतता, समता आणि मानवतेचे प्रतीक आहेत. त्यांच्या प्रतिमेचा अवमान करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असून अशा कृत्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजातील श्रद्धास्थानांचा अवमान करण्याची प्रवृत्ती वाढत असेल, तर त्यावर वेळीच लगाम घालणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याची भावना यावेळी आर. पी. आय. युवक जिल्हा अध्यक्ष प्रदीप (पप्पू) बनसोडे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!