राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी शहर स्वच्छतेसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत नागरिकांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी रस्त्यावर किंवा उघड्यावर कचरा टाकू नये, आपला परिसर स्वच्छ ठेवावा आणि कचरा नगरपालिकेच्या कचरा गाडीतच टाकावा, असे आवाहन त्यांनी रात्री ८:३० वाजता ग्राऊंडवर थेट भेटून केले. स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी व नागरिकांना जबाबदार बनविण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला असून, यात केवळ सूचना न देता थेट शहरात फिरून नागरिकांशी संवाद साधणे हा महत्त्वाचा भाग आहे.
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर रात्री गस्त करून शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांची परिस्थिती, स्वच्छतेविषयी त्यांचे मत आणि येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून अनेकांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होत आहे. मुख्याधिकारी लोंढे यांचा हा थेट संवाद लोकसहभाग वाढविण्यास मदत करतोय. स्वच्छ शहर ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे पोहोचत आहे. मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या या कार्यशैलीचे नागरिकांनी कौतुक केले असून, शहर स्वच्छतेसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या प्रयत्नामुळे शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहण्याचा मार्ग सुकर होत आहे.
