लडाखच्या थंड वाळवंटाला हरित आशेचे रुप देणारे अभियंता, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक सोनम वांगचुक आज जागतिक पातळीवर ओळखले जातात. १ सप्टेंबर १९६६ रोजी लडाखमधील अलची गावात जन्मलेले वांगचुक लहानपणी गावात शाळा नसल्याने प्रथम गृहशिक्षण घेतले. पुढे श्रीनगर येथून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली तसेच फ्रान्समध्ये Earthen Architecture मध्ये विशेष शिक्षण घेतले.
१९८८ मध्ये त्यांनी SECMOL (Students’ Educational and Cultural Movement of Ladakh) ही संस्था स्थापन केली. स्थानिक भाषेत, स्थानिक गरजांना अनुसरून शिक्षण द्यावे या हेतूने ही चळवळ उभी राहिली. त्यांच्या पुढाकाराने सरकारी शाळांमध्ये Operation New Hope सारखे प्रकल्प राबवले गेले. SECMOL कॅम्पस आज पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारा आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाने साकारलेला एक आदर्श प्रकल्प आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी वांगचुक यांची ‘आइस स्टुपा’ ही जगप्रसिद्ध संकल्पना आहे. कृत्रिम ग्लेशियरच्या या तंत्रामुळे वसंत ऋतूत शेतकऱ्यांना पाणी मिळते. हा उपक्रम लडाखसोबतच हिमालयातील इतर देशांनाही प्रेरणा देतो.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना २०१८ साली रॅमन मॅगसेसे पुरस्कार, २०१६ मध्ये रोलेक्स अवॉर्ड, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले. त्यांच्या कार्यप्रणालीवर आधारितच ३ Idiots या चित्रपटातील ‘फुन्सुख वांगडू’ हे पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात घर करून गेले.
आज ते केवळ वैज्ञानिक किंवा शिक्षक नाहीत, तर लडाखच्या पर्यावरणीय, सांस्कृतिक व राजकीय हक्कांसाठी लढणारे नेते म्हणून उभे आहेत. सोनम वांगचुक यांचे जीवन हे स्थानिकतेला जागतिकतेशी जोडणाऱ्या संघर्षशील प्रवासाचे प्रेरणादायी उदाहरण मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!