राहाता शहरातील जुनी गढी येथे शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळ व राहाता ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ५१ फुटी रावणदहनाचा सोहळा जल्लोषात पार पडला. राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बाण मारून रावणदहन करण्यात आले. सुमारे अर्धा तास आकाशात फटाक्यांची आतिषबाजी रंगत होती. महिला-पुरुष, लहानांपासून वृद्धांपर्यंत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी हा देखावा डोळ्यात व मोबाईलमध्ये टिपला.
या प्रसंगी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “सण-उत्सव हे फक्त आनंदासाठी नसतात तर समाजजागृतीचा संदेशही देतात. जुन्या चलीरीती, दहशतवाद व अर्बन नक्षलवाद यांचे दहनही रावणासोबत झाले पाहिजे. विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय, तसेच अखंड भारतासाठी संघटित होण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.”
शिवगर्जना मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत मंत्री विखे पाटील म्हणाले की, १४ वर्षांपूर्वी याच ठिकाणी त्यांनी रावणदहन केले होते, आणि आज पुन्हा तो योग आला हे भाग्य मानतो. यापुढे दरवर्षी हा सोहळा होण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
रावणदहनापूर्वी कलाकारांनी सादर केलेल्या रामलीला नाटकाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांचे विशेष कौतुकही मंत्री विखे पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी केले व आभार प्रदर्शन भाजपा मंडलाध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी मानले.