श्री साईबाबांनी समाधीप्रवेशाच्या वेळी त्यांच्या परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना विजयादशमीच्या प्रसंगी दिलेल्या दिव्य ९ नाण्यांचा १०८ वा अभिषेक सोहळा शिर्डीत भक्तिभाव व उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा शिर्डीतील श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट च्यावतीने दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात येतो.
२ ऑक्टोबर रोजी भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक विधीत देश-विदेशातील असंख्य साईभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला तसेच महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या दिव्य परंपरेला जोडून भक्तांमध्ये अपार श्रद्धा आणि आनंदाचे वातावरण होते.
सोहळ्याचे पूजनकार्य कै. लक्ष्मीबाई शिंदे यांच्या नात श्रीमती शैलजाताई शिंदे-गायकवाड व पणतू, अरुणराव शिंदे गायकवाड (ट्रस्टी), सौ. संगीता अरुणराव गायकवाड (ट्रस्टी), साई ९ ग्रुप चे संचालक साईराज अरुणराव गायकवाड, सौ. स्नेहल साईराज गायकवाड पाटील व यशराज गायकवाड पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
हा अभिषेक सोहळा शैलजाताई शिंदे-गायकवाड यांच्या निवासस्थानी, साई वेदांत बिल्डिंग, शिर्डी येथे दरवर्षीप्रमाणे पार पाडण्यात आला.
या माध्यमातून भक्तांना साईबाबांच्या नऊ नाण्यांच्या अमूल्य वारशाचे स्मरण करून देण्यात आले, ज्यातून साईबाबांची करुणा, श्रद्धा आणि भक्तीचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवला जातो.
