शिर्डीच्या भूमिपुत्र युवा विधिज्ञ गौरव जितेश लोकचंदाणी यांची नवी मुंबईतील एनएमआयएमएस (NMIMS) विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉ मध्ये पार पडलेल्या सातव्या इंट्रा मूट कोर्ट स्पर्धा २०२५ मध्ये न्यायाधीश म्हणून निवड झाली. त्यांच्या उल्लेखनीय न्यायविषयक जाण, शांत व वस्तुनिष्ठ दृष्टिकोनामुळे विद्यापीठाने त्यांचा विशेष सन्मान केला.
स्पर्धेदरम्यान गौरव लोकचंदाणी यांनी विद्यार्थ्यांच्या युक्तिवादांचे बारकाईने परीक्षण करत त्यांना युक्तिवादात तथ्य, भाषेत संयम आणि विचारात न्याय असावा असा मोलाचा संदेश दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला प्रतिष्ठेचा दर्जा लाभला, असे आयोजक समितीने सांगितले.
विद्यापीठाने त्यांच्या योगदानाचे कौतुक करत भविष्यातील शैक्षणिक आणि न्यायविषयक उपक्रमांमध्ये सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रिया, निर्णयक्षमता आणि न्यायशास्त्राचा सखोल अनुभव मिळाला.
या राष्ट्रीय सन्मानामुळे शिर्डीकरांमध्ये अभिमान व आनंदाचे वातावरण आहे. नागरिक, शिक्षक, आणि सामाजिक संस्थांनी गौरव लोकचंदाणी यांचे अभिनंदन केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते पाटील (शिंदे गट) आणि सचिन कोते पाटील (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी म्हटले की —
शिर्डीचा सुपुत्र राष्ट्रीय दर्जाच्या कायदा शिक्षण संस्थेत न्यायाधीश म्हणून सन्मानित झाला, हे प्रेरणादायी आहे.
शांत, सुसंस्कृत आणि अभ्यासू दृष्टिकोनाने विद्यार्थ्यांच्या मनात न्यायप्रेम निर्माण करणारे गौरव लोकचंदाणी हे शिर्डीचे अभिमानस्थान ठरले आहेत.