राहाता शहरात आज एक वेदनादायक दृश्य घडलं. ज्या राजकारणासाठी, ज्या पक्षासाठी आयुष्यभराची निष्ठा ओतली, घराची राखरांगोळी झाली, गुन्हे छातीवर घेतले, तडीपारी-जेल सहन केलं. त्या पक्षानेच अचानक राजेंद्र पठारे यांना हाकलून दिलं. आणि त्या क्षणी फुटलेले त्यांचे अश्रू, ते फक्त एका कार्यकर्त्याचे नव्हते, ते निष्ठेच्या पायावर वार करणाऱ्या राजकारणाचे जाहीर सचित्र आरोपपत्र होते.
शिवसेनेतील कडवे, तडफदार, विखे पाटिल विरोधाचा झेंडा उंचावणारे राजेंद्र पठारे, आज त्यांनाच शिवसेनेना (उबाठा) पक्षाने बाहेर फेकल्याने संपूर्ण राहाता हादरलं आहे. कारण राहाता शहरात पठारे फक्त नेता नाहीत; ते एक भावना आहेत, एक परंपरा, एक जिद्द, आणि पक्षासाठी अंगारावर चालणारा एक शिपाई.
सुरुवात झाली, जेव्हा राजेंद्र पठारेंनी महाविकास आघाडीला ठाकरे सेनेच्या मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. कारण त्यांना राहाता-शिर्डीत ठाकरे सेनेचं अस्तित्व जिवंत ठेवायचं होतं. मात्र याच मागणीवरून स्थानिक महाआघाडीतील काही नेत्यांनी त्यांना डावललं आणि गुपचूप लोक क्रांती सेना उभी करत राजकारणाची मांडवलीच बदलली. पठारेंनी मात्र हार मानली नाही; ते थेट वरिष्ठ पातळीवर गेले आणि पक्षाचा एबी फॉर्म आणला. हा एबी फॉर्म म्हणजेच स्थानिक पुढाऱ्यांच्या पायाखालची जमीन घसरायला पुरेसा ठरला.
नंतर जे घडलं ते बघून राहाता शहरातील ज्येष्ठ शिवसैनिकांचाही विश्वास बसला नाही राजेंद्र पठारे, सागर लुटे व उज्वला होले यांची धडाधड हकालपट्टी! समर्थकांचा आरोप स्पष्ट, ही सगळी संगमनेरची चाल आहे. कारण पठारेंनी पक्षाच्या मशालीवर आणि अपक्ष असे दोन्ही अर्ज भरले, आणि दोन्ही वैध ठरले. त्यामुळे ते कोणत्या चिन्हावर उतरतात, याचा सस्पेन्स आजही शहरभर धगधगत आहे.
राजकारणात ताकद पदांमधून नाही, तर जनतेच्या विश्वासातून येते. आणि त्यावरून पाहायचं तर पठारेंनी बालशिवसैनिकापासून उपनगराध्यक्षपदापर्यंत प्रचंड जनाधार कमावला. एकनाथ शिंदे यांच्याशी कौटुंबिक नातं असूनही, कठीण काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभं राहण्याचं धैर्य दाखवणारा नेता म्हणून त्यांची ओळख पक्की आहे. प्रभाग ५, ६, ७ मध्ये त्यांचा प्रभाव आजही निर्णायक आहे.
आता त्यांनी भावनिक आवेगात केलेले आरोप शहराच्या गल्लीपासून सोशल मीडियापर्यंत वणव्याप्रमाणे पसरले आहे! राहाता-शिर्डीत ठाकरे सेना नाही… ती कोल्हे-थोरात सेना झाली आहे. शिवसैनिक म्हणवणारे अमित शाह यांच्या कार्यक्रमाला जातात, हे पक्षाला मान्य? घर जळलं, जेल भोगली, आणि आज त्याच पक्षातून हकालपट्टी? हा आमचा गुन्हा होता का? मशाल चिन्ह जिवंत ठेवण्याची तळमळ हीच चूक ठरली का? हे प्रश्न फक्त पठारेंचे नाहीत; ते हजारो निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनात साचलेला संताप ओरडून सांगत आहेत.
आज प्रश्न एकच! राजेंद्र पठारेंच्या अश्रूंची किंमत कोणाला मोजावी लागणार? हे उत्तर आता मतपेटीतूनच बाहेर येणार. आणि त्या दिवशी राहात्याचं राजकारण जसं होतं तसं कधीच राहणार नाही इतकंच निश्चित.