“मतपेटीत कैद निकाल, प्रभागात फिरती आश्वासनं; ‘आम्ही तुम्हालाच मत दिलं!’ उमेदवार हवेत, मतदार हैराण”
नगरपरिषदेची निवडणूक पार पडली, मतदानाचा उत्सवही संपला. निकाल मात्र अजूनही मतपेटीत कैद आहे. लांबलेल्या निकाल प्रक्रियेमुळे राजकीय चित्रात अनिश्चिततेची धूळ उडाली असून, या धुराळ्यात उमेदवारांचे भविष्य अडकले आहे. निकालाची वाट पाहताना अनेक उमेदवार पुन्हा एकदा आपल्या-आपल्या प्रभागात उतरले असून ‘जनमत’ जाणून घेण्याच्या नावाखाली मतदारांच्या दारात हजेरी लावत आहेत.
पण ही भेटगाठ लोकशाहीच्या गाभ्याला छेद देणारी ठरत आहे. मतदान हे गुप्तदान असते, हा मूलभूत लोकशाही सिद्धांत प्रत्यक्षात मात्र या भेटींमुळे दबावाखाली येताना दिसतो. कोणाला मत दिले, हे सांगण्याची अडचण मतदारांसमोर उभी ठाकली आहे. परिणामी, “आम्ही तुम्हालाच मतदान केले” हा एकच सुरक्षित वाक्यप्रयोग मतदारांकडून सर्व उमेदवारांना ऐकू येत आहे. यातून उमेदवार हवेत तरंगत आहेत, तर सामान्य मतदार मात्र मनातून हैराण आणि अस्वस्थ झाले आहे.
एका बाजूला निकालाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, दुसऱ्या बाजूला मतदारांवर अनावश्यक मानसिक ताण वाढत आहे. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतरही मतदारांची सुटका होत नसेल, तर लोकशाहीचा अर्थच काय? मतदारांचे काम मतदानापुरते मर्यादित असायला हवे; त्यानंतर स्पष्टीकरण देण्याची वेळ येऊ नये, हीच अपेक्षा.
निकाल जाहीर होईपर्यंतचा हा काळ संयमाचा असतो. पण संयमाऐवजी जर ‘जनमत तपासणी’च्या नावाखाली दबावाची राजकारणं सुरू राहिली, तर ती लोकशाहीची थट्टा ठरेल. उमेदवारांनी वास्तव स्वीकारावे, निकालाची वाट पाहावी आणि मतदारांनीही निर्धास्त राहावे कारण मतपेटीच अंतिम सत्य सांगणार आहे, प्रभागात फिरणाऱ्या अफवा नव्हे.