राहाता शहरात कायद्याने बंदी असलेला ‘बिंगो’ ऑनलाईन मटका आजही निर्ढावलेल्या पद्धतीने सुरू आहे. यावर वारंवार तक्रारी, निवेदने आणि प्रसारमाध्यमांतून ठळक बातम्या होऊनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई का होत नाही? हा प्रश्न आता फक्त पत्रकारांचा नाही, तर संपूर्ण शहराचा बनला आहे.
कायदा दिसतोय, पण अंमलबजावणी कुठे आहे? उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी अमोल भारती यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नावानेही यापूर्वी विषय उघडपणे मांडण्यात आला. तरीही प्रत्यक्षात बिंगो मटका सुरूच, एजंट मोकाट, व्यवहार खुलेआम मग कायद्याचा धाक संपलाय की धंदेवाल्यांना अघोषित संरक्षण आहे? असा थेट सवाल उपस्थित होतो.
मटका नव्हे, गुन्हेगारीची फॅक्टरी! राहात्यात बिंगो मटका हा केवळ खेळ राहिलेला नाही; तो गुन्हेगारीची नर्सरी बनत चालला आहे. या अवैध धंद्यामुळे चोऱ्या व फसवणुकीच्या घटनांत वाढ, तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे, कुटुंबांमध्ये आर्थिक उद्ध्वस्तता असा साखळी परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. बिंगो मध्ये हरलेले पैसे भरून काढण्यासाठी गुन्हेगारी मार्ग स्वीकारला जात असल्याचे वास्तव प्रशासन नाकारू शकते का?
सावकारीला आयती संधी; सामान्य नागरिकांची पिळवणूक! बिंगोमुळे कर्जबाजारी झालेले तरुण व कामगार सावकारांच्या जाळ्यात अडकत आहेत. जास्त व्याज, रिकामे धनादेश, मानसिक दबाव हे प्रकार शहरात उघड गुपित झाले आहेत. प्रश्न साधा आहे हे सर्व प्रशासनाच्या नकळत घडतेय का, की दुर्लक्षामुळे फोफावतेय?
शिर्डीच्या सान्निध्यात कायद्याची अशी विटंबना? श्रद्धेचे जागतिक केंद्र असलेल्या शिर्डीच्या उंबरठ्यावरच जर अवैध मटका, गुन्हेगारी आणि सावकारी बिनधास्त सुरू असेल, तर कायदा-सुव्यवस्थेचा संदेश काय जातो? कायदा केवळ सर्वसामान्यांसाठी आहे का? हा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात! आजवर तक्रारी झाल्या, बातम्या झाल्या, नावे घेतली गेली पण कारवाई शून्य. ही परिस्थिती केवळ निष्काळजीपणाची नसून प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण करणारी आहे.
आता मौन नाही, थेट इशारा जर बिंगो मटका, त्याचे एजंट, आणि त्याला खतपाणी घालणारी सावकारी यांच्यावर दृश्य, ठोस व कठोर कारवाई झाली नाही, तर हा विषय जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक व राज्य शासनाच्या दरबारी नेण्याचा इशारा नागरिक देत आहेत.
ही बातमी केवळ माहिती देण्यासाठी नाही; ती पोलीस प्रशासनाला आरसा दाखवण्यासाठी आहे. आता प्रश्न एकच राहाता शहरात कायदा चालणार की बिंगो-मटका?