शनिवारी रात्री अचानक कोसळलेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीने राहाता शहरात हाहाकार माजला. रस्त्यावर पाण्याचे लोंढे वाहत होते, घरांमध्ये पाणी शिरले होते, आणि नागरिक भयभीत झाले होते. अशा संकटाच्या काळात, जेव्हा सारे शहर भेदरलेल्या अवस्थेत घरात लपले होते, तेव्हा राहाता शहराचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमध्ये आपल्या कर्तव्याची ज्योत पेटवत, रात्रीच्या अंधारात नागरिकांसाठी देवदूत बनून धावले. रात्रीचे जिथे कोणीही बाहेर पडण्याची हिंमत करत नव्हते, तिथे वैभव लोंढे यांनी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीत आपल्या जीवाची पर्वा न करता शहरातील पूरग्रस्त भागांत धाव घेतली. संभाजी चौक, पैंजण बाबा मळा, साई कॉलनी, रांझणगाव रोड, श्रीराम नगर, छत्रपती कॉम्प्लेक्स, शनी चौक, विरभद्र मंदिर परिसर, नगर – मनमाड रोड शिरखंडे वढा, अस्तगांव रोडचा पत्री पूल आणि पिपंळवाडी रोडच्या घनकचरा परिसरात पाण्याने थैमान घातले होते. या प्रत्येक ठिकाणी मुख्याधिकारी लोंढे स्वतः उपस्थित राहिले आणि नागरिकांना दिलासा देत राहिले. जेव्हा लोंढे यांना माहिती मिळाली की, अस्तगांव रोडच्या पत्री पुलाजवळ आणि पिपंळवाडी रोडच्या घनकचरा परिसरात काही कुटुंबे पुरात अडकली आहेत, तेव्हा लोंढे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी धाव घेतली. रात्रीच्या गडद अंधारात, खोल पाण्यातून वाट काढत त्यांनी या कुटुंबांना सुखरूप बाहेर काढले आणि चितळी रोडवरील जिल्हा परिषद शाळेत त्यांची राहण्याची व्यवस्था केली. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या खिशातून त्यांनी या कुटुंबांसाठी कपडे आणि जेवणाची सोय केली. भुकेलेल्या आणि थंडीने कुडकुडणाऱ्या त्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर लोंढे यांच्या या कृतीने दिलास्याचे हास्य उमटले.
राहात्यातील अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरले होते. रस्ते नद्यांसारखे वाहत होते. अशा परिस्थितीतही लोंढे यांनी थकवा, भीती किंवा रात्रीचा अंधार यांना आपल्या कर्तव्याच्या आड येऊ दिले नाही. रात्रभर ते शहरातील प्रत्येक पूरग्रस्त भागात फिरत राहिले, लोकांना सुरक्षित स्थळी हलवत राहिले आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्याने अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळाली.
नागरिकांचा आवाज: “असा अधिकारी होणे नाही!” “रात्रीच्या काळोख्या अंधारात आम्ही पुरात अडकलो होतो. कोण येणार आम्हाला वाचवायला? पण लोंढे साहेब स्वतः आले. त्यांनी आम्हाला बाहेर काढलं, जेवण दिलं, कपडे दिले, राहण्याची सोय केली. आमच्यासाठी ते देवदूतच होते,” असे भावूक उद्गार अडकलेल्या एका कुटुंबातील व्यक्तीने काढले. शहरातील नागरिक आज लोंढे यांच्या या निस्वार्थ सेवेची प्रशंसा करताना थकत नाहीत. त्यांच्या कार्याने केवळ संकटात सापडलेल्यांना आधार मिळाला नाही, तर संपूर्ण राहाता शहराला एक खरा व कर्तव्यदक्ष अधिकारी लाभल्याची जाणीव झाली.
वैभव लोंढे यांच्यासारखे अधिकारी खऱ्या अर्थाने समाजाचे खरे आधारस्तंभ ठरले. जेव्हा सारे शहर झोपी गेले होते, तेव्हा ते रात्रभर जागे राहिले, केवळ आपल्या कर्तव्याच्या आणि माणुसकीच्या जाणिवेतून. त्यांच्या या कार्याला सलाम करताना प्रत्येक राहाताकराच्या मनात एकच भावना आहे – “असा अधिकारी होणे नाही!”
या संकटकाळात वैभव लोंढे यांनी दाखवलेल्या निस्वार्थ सेवेने आणि नेतृत्वाने राहाता शहराच्या हृदयात कायमचे स्थान मिळवले आहे. त्यांचा हा पराक्रम प्रत्येकासाठी प्रेरणा आहे आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा विश्वास देणारा आहे.