अहिल्यानगर शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक वादाने तीव्र रूप धारण केले आहे. दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी काढलेल्या रांगोळीत ‘आय लव्ह मोहम्मद’ असा मजकूर लिहून मुस्लिम समाजाच्या भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत स्थानिक मुस्लिम समाजाने कोटला परिसरात रास्तारोको आंदोलन केले. यात दगडफेक झाल्याचे सांगण्यात आले असून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, आंदोलनकर्त्यांपैकी ३० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या वादाची पार्श्वभूमी व निवेदन यासंदर्भात जमीयत उलेमा-ए-हिंद, राहाता तालुका संघटनेने कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की, २९ सप्टेंबर रोजी (सोमवार) सकाळी माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीत इंग्रजी अक्षरात ‘आय लव्ह मोहम्मद’ असा मजकूर रेखाटण्यात आला होता. हा मजकूर प्रेषित पैगंबर मुहम्मद (स. अ. व) यांच्याशी जोडला जाऊन जाणीवपूर्वक अपमानास्पद असल्याचा आरोप मुस्लिम समाजाने केला. दुर्गा दौड या रांगोळीवरून काढण्याचा प्रयत्न करून हा अपमान अधिकच गंभीर करण्यात आल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे मुस्लिम समाजात संतापाची लहर उसळली आणि कोटला स्टँड परिसरात आंदोलकांनी पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्तारोको केला. आंदोलकांनी दगडफेक केल्याने वाहतूक कोंडी झाली आणि तणाव वाढला.
पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात काही जण जखमी झाल्याची नोंद आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, रांगोळी काढण्याच्या प्रकरणात आरती संग्राम रासकर व संग्राम आसाराम रासकर (रा. बारातोटी कारंजा) यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे. यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे, तर आंदोलन व दगडफेक प्रकरणी ३० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले की, तपास सुरू असून, शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ व कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी जमीयत उलेमा-ए-हिंद, राहाता तालुका संघटनेने निवेदन दिले आहे. संघटनेच्या वतीने म्हटले आहे की, प्रेषित पैगंबर मुहम्मद (स.अ.व.) हे मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र व आदरणीय आहेत. अशा अपमानास्पद कृत्यांमुळे केवळ धार्मिक भावना दुखावत नाहीत, तर समाजात द्वेष व तणाव निर्माण होतो. आरोपींवर धार्मिक भावना दुखावण्याच्या कलमांतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेने सर्व समाज घटकांना संयम बाळगण्याचे आवाहन करताना, शासनाने सामाजिक सलोखा राखण्यासाठी ठाम भूमिका घ्यावी, असेही सांगितले.
या प्रसंगी जमीयत उलेमा-ए-हिंद, राहाता तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष हाफिज वसीम शेख, उपाध्यक्ष जावेद पठाण व हाजी मुन्नाभाई शहा, जनरल सेक्रेटरी समीर शेख, सेक्रेटरी आर्क. असद पटेल, तसेच जीशान शेख, पत्रकार राजूभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते इलियास शहा, जमील शहा, पत्रकार मुश्ताक शाह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी एकत्रितपणे या घटनेची कठोर निंदा केली आणि राहाता पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी यांच्याकडे निवेदन सादर केले. पोलिसांनी निवेदन स्वीकारले असून, तक्रारीची गांभीर्याने दखल घेतल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची माहिती घेतली असून, शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या वादामुळे शहरात तणाव असल्याने दुकाने बंद ठेवण्यात आली असून, सोशल मीडियावरूनही या घटनेवरून संभ्रम पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, कायद्याच्या चौकटीतून न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही घटना महाराष्ट्रातील धार्मिक सहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर घडली असल्याने, स्थानिक प्रशासनाने सतर्कता बाळगावी, अशी मागणी होत आहे.