भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे करणारी आणि संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना नुकतीच सर्वोच्च न्यायालयात घडली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या दिशेने एका वकीलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि “सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” अशी घोषणा देत न्यायालयीन शिस्तीचा भंग केला. या भ्याड आणि अमर्याद कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत राहाता येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे निवेदन देण्यात आले.
राहाता पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांना हे निवेदन देताना आर.पी.आय. (ए) चे शहराध्यक्ष राजेंद्र पाळंदे, तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे, जिल्हाध्यक्ष प्रदीप (पप्पु) बनसोडे, तसेच गणेश निकाळे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेचा निषेध करताना प्रदीप बनसोडे यांनी आपली भावना व्यक्त केले की, “हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून तो भारतीय लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेवर झालेला आहे. अशा प्रवृत्तींना समाजात स्थान मिळू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेवर गदा आणणाऱ्या आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.”
निवेदनात नमूद करण्यात आले की, या प्रकाराने केवळ न्यायालयीन व्यवस्थेचा नाही तर देशाच्या न्यायमूल्यांचा अवमान झाला आहे. म्हणून संबंधित वकीलाची वकिली रद्द करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या घटनेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “न्यायालय, संविधान आणि लोकशाही या त्रिसूत्रीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरीकाने एकजुट राहून अशा विकृत विचारसरणीला विरोध केला पाहिजे,” असा ठाम संदेश या निवेदनातून देण्यात आला आहे.
राहाता येथील आर.पी.आय. (ए) पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या या निषेध निवेदनामुळे समाजात जागरूकतेची भावना निर्माण झाली.