राहाता शहरात कायद्याचा धाक संपला आहे का? हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून बसला आहे. कारण शहराच्या मध्यवर्ती भागात — छत्रपती संकुल परिसरात व नगर-मनमाड रोड तसेच बाजारतळ भागात बिंगो आणि मटका सारखे अवैध धंदे अक्षरशः खुल्या पद्धतीने सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
जिथे महिलांची वर्दळ, विद्यार्थ्यांची ये-जा आणि नागरिकांची चहलपहल असते, त्या भागातच मटका टपऱ्या आणि बिंगो केंद्रे निर्धास्तपणे सुरू आहेत. छत्रपती संकुलातील काही गाळ्यांमधून आणि मोकळ्या जागेत हे धंदे मोठ्या प्रमाणावर चालत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
यामध्ये विशेष म्हणजे हे सर्व काही गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांच्या संरक्षणाखाली चालत असल्याची चर्चा शहरभर आहे. “पोलीस प्रशासनाने या धंद्यांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे का?” असा सवाल नागरिक आता सर्रास विचारताना दिसत आहेत.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी संशयास्पद हालचाली, पैशांचा उघड उघड खेळ आणि भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक म्हणतात – “पोलीस जर मौन धारण करत असतील, तर यामागे कोणाचा आशीर्वाद आहे?”
पोलीस प्रशासनाने या अवैध बिंगो-मटका साम्राज्यावर कारवाई केली नाही, तर नागरिकांचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. शहरात कायद्याचे राज्य आहे की माफियांचे? हा प्रश्न आता राहाता शहराच्या रस्त्यावर, प्रत्येक नागरिकाच्या तोंडी गाजत आहे!