राहात्यातील बिंगो-मटका राज उघड्यावर; नागरिकांचा उद्रेक, पण पोलीस मात्र ‘मौनधारी’!
कायद्याने चालणाऱ्या समाजात जर गुन्हेगार मोकळे, आणि प्रामाणिक नागरिक भयभीत असतील, तर ती प्रशासनाची सर्वात मोठी पराभूती असते. आणि नेमकं तेच राहाता शहरात घडतंय! शहरात बिंगो आणि मटका यांचा उघड उघड डंका वाजत असताना, नागरिकांच्या मनात संतापाचा ज्वालामुखी धगधगत आहे.
छत्रपती संकुल परिसर, नगर–मनमाड रोड, बाजारतळ या भागांत दिवसेंदिवस वाढणारे हे अवैध धंदे आता “गुन्हेगारीच्या मुक्त बाजारात” रूपांतरित झाले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह, तर युवकांना गुन्हेगारीच्या वाटेवर ढकलणारे हे ठिकाण नागरिकांच्या नजरेत अवैध जुगार केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
अनेकदा बातम्या मार्फत व सोशल मीडियावर पोस्टद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले, पण पोलीस प्रशासनाचे मौन मात्र आश्चर्यकारक आणि शंकास्पद आहे. जणू काही या अवैध धंद्यांवर कोणाच्यातरी “अदृश्य छत्रछाया” आहे, अशी चर्चा रस्त्यावरून घराघरात पसरली आहे.
“कायद्याचा धाक आता केवळ कागदापुरता राहिला आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारताना दिसतात. लोकशाहीत नागरिकांचा आवाज हा सर्वात मोठा अधिकार असतो, पण तो जर दुर्लक्षित राहिला, तर समाजात बेकायदेशीरता मुळ धरते — आणि राहात्यातील परिस्थिती तशीच आहे.
नागरिकांच्या अपेक्षा साध्या आहेत — शांतता, सुरक्षितता आणि न्याय. त्यासाठी पोलीस प्रशासनाने आता केवळ कागदी नोंदी नव्हे, तर प्रत्यक्षात उतरून धडक कारवाई करावी. कारण आता जनता शांत नाही.
सुजय दादा, तुमच्याकडेच अपेक्षा! शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या युवकांचे आशास्थान सुजय दादा विखे पाटील, तुम्ही अनेकदा म्हणता — “मी मतदारसंघातील गुन्हेगारी संपवली आहे.” मग आज या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी शहरात बिंगो–मटका उघड्यावर सुरू करून कायद्याला आव्हान दिलंय, त्याकडे तुमचं लक्ष का नाही? जनतेचा प्रश्न सरळ आहे — “दादा, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, पण हे दृश्य पाहून तो विश्वास डळमळतो आहे.”
पोलीस प्रशासन निद्रावस्थेत आहे, कारवाईचा कुठेही मागमूस नाही. दादा, तुम्हीच त्यांना जाग आणू शकता. कारण राहाता शहर आता शांत नाही — इथल्या नागरिकांना कायदा हवेय, केवळ आश्वासन नव्हे!