राहाता तालुक्यात आज पुन्हा एकदा लाचलुचपत प्रकरण उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नुकतेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांवर कोटी रुपयांच्या लाचेचा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा सुरू असतानाच राहाता पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला पंधरा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
१८ सप्टेंबर रोजी तक्रारदाराचा खडीने भरलेला डंपर राहाता पोलिसांनी कापसेंच्या गीतगंगा हॉटेलजवळ पकडला होता. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी पोलीस कर्मचारी अनिल रामनाथ गवांदे (पोकॉ, राहाता पोलीस स्टेशन) यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून, राहाता हद्दीत खडी, वाळू वाहतूक करायची असल्यास दरमहा २० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी मागणी केली.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देताच त्यांनी २४ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार नोंदवली. पडताळणीत गवांदे यांनी २० हजार पैकी १५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली.
२५ सप्टेंबर रोजी पंचांच्या उपस्थितीत सापळा रचून गवांदे यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू अल्हाट यांच्या नेतृत्वाखाली, उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. पथकात पोलीस नाईक चंद्रकांत काळे, शेखर वाघ, किशोर कुळधर व चालक दशरथ लाख यांनी सहभाग घेतला. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तागडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
लाचलुचपत विभागाचे आवाहन भ्रष्टाचाराविरोधात सर्वांनी पुढे यावे, कुणीही लाच मागितल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.