राहाता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर झटणारे प्रकाश उर्फ मामा पगारे (वय ७५) यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या अमानुष आणि अपमानास्पद कृत्याचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मंगळवारी रुग्णालयात जात असताना काही भाजप पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना फसवून बोलावले. भर रस्त्यात त्यांच्यावर दमदाटी करत साडी परिधान केली गेली आणि जातिवाचक वक्तव्य करून त्यांच्या सन्मानावर गंभीर आघात करण्यात आला. या घटनेवर काँग्रेस नेत्या सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या, “हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नाही, तर ज्येष्ठ नागरिक, दलित समाज आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानावर प्रहार आहे. ही गुंडगिरी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर काळिमा फासणारी आणि संविधानाच्या मूल्यांना धक्का देणारी आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रशासनाकडे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सौ. घोगरे म्हणाल्या, “संबंधितांवर तात्काळ कठोर गुन्हा दाखल झाला नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने लढा उभारेल.” या प्रकरणी काँग्रेसने राहाता तालुका पोलीस ठाण्यात निवेदन देऊन निषेध नोंदवला. यावेळी ॲड. पंकज लोंढे, सचिन चौगुले, विक्रांत दंडवते, शिवसेनेचे सचिन कोते, संजय शिंदे, सुनीता कोरडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे, काँग्रेससोबत शिवसेनेचे कार्यकर्तेही या निषेधात सहभागी झाले, ज्यामुळे पक्षीय एकजूट दिसून आली. काँग्रेसने न्याय मिळेपर्यंत ठाम भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला असून, सामाजिक सलोखा आणि संविधानाचे मूल्य जपण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.