कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला ‘ईस्टर्न युरोप अवॉर्ड’; विदेशात पुन्हा एकदा मानाचा तुरा अल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणी व दिग्दर्शनाचा युरोपात डंका
तत्वनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक राजकारणी म्हणून नावाजलेले आमदार व मंत्री दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित ‘कर्मयोगी आबासाहेब’ या चित्रपटाने पुन्हा एकदा विदेशात मानाचा तुरा रोवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नंदेश्वरचे सुपुत्र, लेखक आणि दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ‘ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल’ (रोमानिया) मध्ये बेस्ट डायरेक्टर या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आला आहे.
अल्ताफ शेख यांच्या कल्पक लेखणी आणि उत्तुंग दिग्दर्शनामुळे या चित्रपटाने वास्तवात घडलेली परंतु स्वप्नवत वाटणारी कथा पडद्यावर जिवंत केली. स्व. गणपतराव देशमुख यांचे तत्वनिष्ठ राजकारण, समाजासाठीची निष्ठा आणि त्याग यांचे दर्शन घडवणारा ‘कर्मयोगी आबासाहेब’ हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गाजला आहे. या चित्रपटाने यापूर्वीही देश-विदेशातील पन्नासपेक्षा अधिक पुरस्कार पटकावले असून आता ईस्टर्न युरोप अवॉर्ड मिळाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
रोमानियातील या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील विविध भाषांतील चित्रपटांना नामांकन देण्यात आले होते. त्या कठीण स्पर्धेत ‘कर्मयोगी आबासाहेब’ ने आपली दमदार छाप पाडत बेस्ट डायरेक्टरचा किताब पटकावला.
या यशामुळे अल्ताफ शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र अभिमानाने गौरवलेला आहे. “कर्मयोगी आबासाहेब”—एक सिनेमा नव्हे, तर एका तत्वनिष्ठ राजकारण्याच्या प्रेरणादायी जीवनाचा दस्तऐवज!