राहाता येथील कुंदन लॉन्समध्ये झालेल्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी दिलेलं भाषण म्हणजे फक्त राजकीय विधान नव्हतं, तर ते राहात्याच्या राजकीय वास्तवाचं भान देणारं प्रखर संदेशपत्र ठरलं. “नेत्याचं काम आव्हान देण्याचं असतं. आणि राहाता काय करेल हे मलाही ठाऊक आहे, कारण राहात्याने सदैव विखे परिवारावर प्रेम केलं आहे,” असं ठामपणे सांगत दादांनी विखे परिवार आणि राहाता जनतेमधील दशकांपासूनच्या आत्मीय नात्याची पुन्हा आठवण करून दिली.
दादांनी स्पष्ट सांगितलं–राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यानंतर राहात्याच्या विकासाचा वेग आणि दिशा दोन्ही बदलले. महिलांच्या सुरक्षेपासून रस्त्यांपर्यंत, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नांपासून शहरी पायाभूत सुविधांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या कामांची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुजय दादांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत म्हटलं, “आमच्या माता-भगिनी शिर्डी व राहाता मध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा फोटो आणि महायुतीचं चिन्ह पाहून मतदान करतील,” आणि सभागृहात उत्साहाची लाट उसळली.
पण या भाषणाच्या गडगडाटात एक गोष्ट मात्र राजकीय वर्तुळात कुजबुजते आहे, भावी उमेदवारांचा बाजारच गायब झालाय! काही दिवसांपूर्वी चहाच्या टपरीवर, चौकाचौकात, चावडीवर आणि कट्ट्यांवर ‘मीच उमेदवार’ म्हणत दिसणारे चेहरे आता गायब आहेत. जिथं दरवेळी चहाच्या कपातून उमेदवारीचं राजकारण उकळायचं, तिथं आता शांतता आणि संभ्रमाचं वातावरण आहे.
सुजय दादांचं भाषण जरी कार्यकर्त्यांना नवचैतन्य देणारं असलं, तरी राजकीय समीकरणं मात्र नव्या रूपात आकार घेत आहेत. राहाता तालुक्याच्या राजकारणात विखे परिवाराचं वर्चस्व कायम असतानाच आता ‘नवे चेहरे आणि नवे विचार’ यांची चर्चा सुरू आहे. “ठराविक मोजक्या लोकांभोवतीच राजकारण फिरवायचे दिवस संपले,” असं दादांनी सांगताच अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हं उमटली.
राहात्याच्या राजकारणात सध्या दोनच प्रश्न चर्चेत आहेत-एक, सुजय दादांचा विकासाचा आत्मविश्वास जनतेपर्यंत पोहोचतो? आणि दुसरा, भावी उमेदवार खरंच मैदानात उतरतील की ‘मार्केटमधून’ कायमचे गायब होतील?
राहात्याचं राजकारण आता एका निर्णायक टप्प्यावर आहे. दादांची गर्जना ऐकू आली आहे आता प्रतिसाद कोण देतो, हेच पाहणं औत्सुक्याचं ठरेल.