चार वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर अखेर राहाता नगरपरिषदेवर पुन्हा एकदा लोकशाहीचा उत्सव उभा ठाकला आहे. निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. चार वर्षे ‘प्रशासन’ या नावाखाली नागरिकांच्या तक्रारी धुळ खात पडल्या, विकास थांबला आणि निर्णयप्रक्रिया काही हातातच केंद्रित राहिली. आता मात्र पुन्हा सत्तेचा तुरा कोणाच्या हाती जाणार याची उत्सुकता चरमसीमेवर आहे.
नगराध्यक्ष पद ओबीसी सर्वसाधारण जाहीर झाल्याने राजकीय गणिते नव्याने मांडली जात आहेत. महाविकास आघाडीने ओबीसी चेहरा म्हणून माळी समाजातील धनंजय गाडेकर यांचा चेहरा पुढे करत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरातील विविध घटकांशी त्यांचे संवाद, बैठकांची मालिका आणि जनसंपर्क मोहिम यामुळे आघाडीने आपली दिशा स्पष्ट केली आहे.
परंतु दुसरीकडे महायुती मात्र ‘गोंधळलेल्या स्थितीत’ असल्याचे दिसते. मंत्री विखे पाटलांचा प्रभाव असलेला हा मतदारसंघ — पण उमेदवाराचा चेहराच अजून ठरलेला नाही!
सत्ताधारी शिबिरात उमेदवारीसाठी ‘भाऊगर्दी’ मात्र प्रचंड आहे. प्रत्येक जण नगराध्यक्षपदाचा ‘योग्य वारस’ असल्याचा दावा करतोय, पण अंतिम निर्णय कुणाच्याही तोंडी नाही. या गोंधळामुळे जनतेत एकच चर्चा — “महायुतीचा उमेदवार कोण?”
शहरातील चहाच्या टपऱ्यांपासून ते राजकीय गल्लीपर्यंत सगळीकडे हाच प्रश्न झळकतोय. महाविकास आघाडीने प्रचाराची मशाल पेटवली, तर महायुतीचा चेहरा अजूनही ‘प्रश्नचिन्हाखाली’ लपलेला आहे. याच गतीने पुढे गेल्यास, आघाडीच्या उमेदवाराला प्रारंभीची आघाडी मिळणार हे चित्र स्पष्ट होत आहे.
महायुतीच्या उमेदवाराची घोषणा विलंबाने झाली, तर त्यांना प्रचारासाठी वेळ मिळणार का? नागरिकांच्या दारात, मनात आणि मतात पोहोचण्यासाठी उरलेला काळ पुरेल का? की शेवटच्या क्षणी उमेदवार घोषित करून “राजकीय धावपळीत” निवडणूक हातून सुटेल?
एकीकडे आघाडीचे गाडेकर मैदानात उतरलेत, रणनीती आखतायत; तर दुसरीकडे महायुतीचा चेहरा अजूनही गोंधळाच्या सावलीत.
शहरातील जनता विचारतेय — “महायुतीतला हा उशीर म्हणजे रणनीती की अनिश्चितता?”  “आणि जर उमेदवारच ठरला नाही, तर विजयाचं स्वप्न कोण बघणार?”
राहाता आता पुन्हा एकदा सज्ज आहे — मतपेटीतून आवाज देण्यासाठी, आणि हुकूमशाहीतून लोकशाही परत आणण्यासाठी. परंतु सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे — निवडणूक केवळ ‘पदासाठी’ नसते, ती नागरिकांच्या विश्वासाची परीक्षा असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!