जनतेच्या हिताच्या सत्तेला खाऊ समजून त्यावर टपून बसणारा एक ‘भाऊ’ पुन्हा चर्चेत! जिथे मिळेल खाऊ, जिथून मिळेल फायदा – तिथेच अचानक त्याचे राजकीय दर्शन होते. जनतेशी प्रामाणिकतेची भाषा करणारा पण प्रत्यक्षात जनतेशीच लबाडी करणारा हा लबाड नेमका कोण? समाज मनात आता एकच कुजबुज “जनतेशी लबाडी करणाऱ्यांना लोकशाहीत अद्दल घडलीच पाहिजे!”
राजकारण नव्हे, तर स्वार्थकारण : पक्ष बदलण्याचा विक्रम!
आजवर कोणत्याही पक्षात न टिकण्याचा दुर्मिळ विक्रम त्याच्या नावावर. कधी याच्या गळ्यात हात, कधी त्याच्या खांद्यावर हात, कधी सत्ताधारींकडे तर कधी विरोधकांकडे – निष्ठा नाही, विचार नाही फक्त स्वार्थाचा ‘कॅल्क्युलेटर’ कायम चालू!
समाजात किंवा शहरात कोणाच्याही कामी न पडलेला माणूस पुढे जनतेच्या कसा कामी पडेल? ज्याने माणसे कायम टांगती ठेवली, खोट्या आश्वासनांनी वेठीस धरले, वेळ काढूपणा केला – तो जनतेच्या विश्वासाचा दावा करतो? हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात वाढत चाललाय.
फायदा फक्त आपल्या घरच्यांचा!
शहरासाठी, समाजासाठी काही केले नाही पण भाचा – भाऊ मात्र नोकरीवर लावले आणि हे सर्व एका तत्कालीन मंत्र्यांचे पाय धरून! समाजातील नव्या चेहऱ्यांना कधी संधी दिली नाही, सामाजिक ट्रस्टमध्ये कधी बदल केले नाहीत व होऊनही दिले नाहीत कारण वर्चस्व आणि प्रतिष्ठा टिकवणे हेच ध्येय!
१९९१ पासून अविश्वासाची परंपरा!
१९९१ मध्ये स्वतःची बाजू निर्धोक ठेवण्यासाठी गरीब उमेदवारावर आरोप करून अन्याय केला. या स्वहिताच्या राजकारणामुळे त्यावेळच्या अध्यक्षांनाही त्रास सहन करावा लागला. आजही तीच प्रवृत्ती कायम आहे, राजकीय त्रास निर्माण करणे, गोंधळ माजवणे आणि स्वतः मात्र सावलीत बसणे.
कोणत्या पक्षाचे? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित!
स्वतःला एका विशिष्ट पक्षाचा सैनिक म्हणवतो, पण निवडणूक मात्र कोणतेही राजकीय चिन्ह न घेता लढवतो! मग तो नेमका कोणत्या पक्षाचा? जनतेची दिशाभूल करण्याची हीच पद्धत ३०-३५ वर्षांपासून सुरू आहे. तरुणांसाठी कधीच ठोस भूमिका नाही, कधी मार्गदर्शन नाही फक्त रिकामे शब्द आणि फोल आश्वासने.
२०१६ ची विश्वासघाताची जखम आजही ताजी!
नगरपरिषद निवडणुकीत एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पाठीत खंजीर खुपसणे, रात्रभर साथ देणाऱ्यांना पहाटेच धोका देणे, समाजाचा उपयोग करून सत्ता मिळवणे आणि मलईसह संपूर्ण दूधच संपवणे हेच त्याचे ‘राजकारण’!
निष्ठा शून्य, स्वार्थ १००%!
सहा महिनेही कोणाच्या सोबत टिकत नाही, प्रत्येक वेळी नवे गडी, नवे राज्य, नवा फायदा! जिथे स्वतःची पोळी भाजते तिथेच भाऊची गाडी धावते. समाजाचा स्वयंघोषित नेता पण प्रत्यक्षात स्वतःचा फायदा पाहणारा ‘मतलबीचा महाराज’.
आजचा जनतेचा प्रश्न: “अशा स्वार्थी, लबाड, अविश्वासू नेत्यावर पुन्हा विश्वास ठेवायचा?” लोकशाहीत जनताच अंतिम न्यायी आणि यावेळी जनता म्हणतेय “जनतेच्या सत्तेला खाऊ समजणाऱ्या भाऊला जनताच आता उत्तर देणार!”
2
1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!