४ नोव्हेंबरपासून राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी आदर्श अचारसंहिता लागली, आणि त्याच क्षणी राहाता शहराचा राजकीय रंगमंच उजळला. शहराचे चौक, गल्ली, बाजारपेठा आणि चव्हाटे पुन्हा एकदा राजकीय गप्पांनी, हसऱ्या हस्तांदोलनांनी आणि छायाचित्रांच्या फ्लॅशने झगमगून गेल्या.
गेल्या चार वर्षांत जनतेपासून कोसो दूर असलेले, विकासाच्या नावाने ‘गायब’ झालेल्या चेहऱ्यांचे आज पुन्हा दर्शन झाले. कालपर्यंत घराबाहेर न पडणारे राजकीय नेते आता घराघरात पोहोचलेत — चहा पिताना, खांद्यावर हात ठेवताना, आणि म्हणताना ‘आपण माझेच आहात, आणि मी तुमचाच!’
राहात्याच्या राजकारणात सध्या गणिते आणि बेरीज सुरू आहे. कोण कोणाच्या पाठीशी, कोण कुणाच्या बाजूला, कोण कुणाचा नवा ‘सोबती’ — याचे समिकरण दररोज बदलतेय. सत्ताधारी- विरोधकांची सीमा धूसर झाली आहे. आज जो कोणाचा शत्रू होता, तो उद्या ‘समर्थक’ ठरतोय. राजकारणात कायम काही नसतं फक्त मतदाराचा अंक नेहमीच महत्त्वाचा!
प्रत्येक उमेदवाराचा सूर आता एकच ‘मीच विकास केला, मीच करू शकतो, आणि इतर सगळे फक्त बोलतात!’ तर काहींचं म्हणणं “तो त्यांचा उमेदवार नाही, तो माझ्या प्रभागाचा नाही — मीच खरा लोकांचा माणूस आहे.” हे ऐकून मतदार गोंधळलेला नाही; तो फक्त शांतपणे निरीक्षण करतोय. कारण त्याला माहित आहे — निवडणुकीच्या हंगामात सगळे “आपले” होतात, पण निकाल लागल्यावर सगळे “व्यस्त” होतात.
शहराच्या चौकात आता प्रत्येक भेटीत एक हिशोब आहे — कुणी जाताना नमन करतोय, कुणी येताना नातं जोडतोय, आणि कुणी फोनवर “आपलेपण” विकत घेतोय. पण या सगळ्या राजकीय गणिताच्या पलीकडे मतदाराचे एकच गणित आहे — जो खरोखर आपल्या वेदना ओळखतो, तोच आपला उमेदवार!
अचारसंहिता लागलीय, पण खरी कसोटी आता लागतेय — उमेदवारांच्या प्रामाणिकतेची, आणि मतदारांच्या जागरुकतेची. कारण हा काळ केवळ प्रचाराचा नाही… हा काळ ओळखण्याचा आहे — खरा जनसेवक कोण आणि अभिनय करणारा कोण!