राहाता नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर विखे पाटलांच्या विश्वासू कार्यकर्त्यांमध्ये हालचाल वेगाने सुरू झाली आहे. नगरपरिषदेपासून लोकसभेपर्यंत नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक शब्दावर निष्ठेने चालणारे कुमार कुलकर्णी यांनी आता आपल्या राजकीय प्रवासातील पुढचा टप्पा निश्चित केला आहे.
कुलकर्णी यांनी २०२५ च्या राहाता नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून आपल्या पत्नी गिरिजा कुलकर्णी यांच्या नावावर उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते ही केवळ राजकीय आकांक्षा नसून, गेल्या अनेक वर्षांच्या निष्ठेची व प्रामाणिक कार्याची एक ‘पावती’ मिळविण्याची वेळ आली आहे.
“मी आजवर नामदार विखे पाटलांसाठी तन, मन आणि धनाने काम केले आहे. विकासाच्या प्रत्येक लढाईत मी त्यांच्या विचारांबरोबर खांद्याला खांदा लावून उभा राहिलो आहे. आता माझ्या घरातील एक व्यक्तीला संधी देऊन विखे पाटलांनी माझ्या कार्याची दखल घ्यावी, एवढीच माझी नम्र विनंती आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया कुमार कुलकर्णी यांनी दिली.
राजकारणात निष्ठा टिकविणं आणि ती वर्षानुवर्षं कृतीतून सिद्ध करणं हे आजच्या काळात दुर्मिळ आहे. कुमार कुलकर्णी यांचं कार्य हे विखे पाटलांच्या विचारधारेचा एक विश्वासार्ह विस्तार मानला जातो. त्यामुळे प्रभाग ८ मधील ही उमेदवारी केवळ स्थानिक निवडणुकीचा भाग न राहता, ‘विश्वास आणि निष्ठा’ यांचा एक कसोटीचा क्षण ठरणार आहे.
विखे पाटलांचे निर्णय नेहमीच संतुलित आणि धोरणात्मक असतात. त्यामुळे आता पाहावं लागेल की त्यांच्या या विश्वासू सैनिकाला — कुमार कुलकर्णींना — या निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळते का, आणि त्यांच्या निष्ठेचं फळ अखेर ‘विकासाच्या मतपेटीतून’ मिळतं का.
