राहाता राजकारणात आज एकच विषय सर्वत्र चर्चेत आहे “विखे पाटलांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण?” निवडणुकीची रणशिंगे वाजली आहेत. सोमवार, १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे आणि १७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. पण तरीही महायुतीचा, म्हणजेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवार अद्याप गुप्त ठेवण्यात आला आहे.
ही मौननीती काही साधी नाही. कारण विखे पाटलांच्या राजकीय प्रवासात ‘टायमिंग’ हीच त्यांची ओळख आहे. ते कोणतीही चाल आधी उघड करत नाहीत उलट प्रतिस्पर्ध्यांना वाट पाहत ठेवणे, गोंधळात पाडणे आणि शेवटच्या क्षणी ‘धक्का’ देणे ही त्यांची खास शैली. आणि म्हणूनच राहाता शहरात आता कुजबुज सुरू झाली आहे “विखे पाटील यांचा उमेदवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी जाहीर होणार का?”
ही वेळ फक्त वेळ नाही ती एक राजकीय संकेत-घडी ठरते आहे. कारण विखे पाटलांचे निर्णय नेहमी ‘संदेशात्मक’ असतात. एकेक वेळ, एकेक हालचाल सर्व काही नियोजित. काहीजण म्हणतात, “२:५५ ही वेळ अंकशास्त्राशी जोडलेली आहे.” तर काहींचे मत, “ही फक्त एक रणनीती आहे, विरोधकांना शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रमात ठेवण्याची.”
महायुतीमध्ये दोन विचारधारा उभ्या राहिल्या आहेत. एक गट म्हणतो “विखे पाटलांचा उमेदवार हा अपेक्षितच असेल; त्यांच्या निष्ठावान व विश्वासू सैनिकांपैकी एक.” तर दुसरा गट ठाम आहे “नाही! यावेळी धक्का बसणारच. उमेदवार पूर्णपणे अनपेक्षित असेल, ज्यामुळे विरोधकच नव्हे तर आपलेही गोंधळून जातील.”
याच कारणामुळे आज राहाता शहरात राजकीय तापमान वाढले आहे. चहाच्या टपरीपासून ते सोशल मीडियापर्यंत एकच चर्चा “विखे पाटलांचा डाव काय असेल?” कारण हे केवळ नगराध्यक्षपदाचे उमेदवारीचं प्रकरण नाही; हे विखे पाटलांच्या पुढील राजकीय समीकरणाचा ‘ट्रेलर’ आहे.
१७ नोव्हेंबर दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी? जाहीर होणारे नाव फक्त एक उमेदवार ठरणार नाही, तर ते असेल विखे पाटलांच्या पुढील दशकातील राजकीय दिशा, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांच्या संघटनशक्तीचा आरसा.
आता नागरिक आणि राजकीय वर्तुळातील प्रत्येक डोळा एकाच दिशेने आहे. १७ नोव्हेंबर, दुपारी २ वाजून ५५ मिनिटे? त्या क्षणी उलगडेल विखे पाटलांचा “धक्का तंत्र” आणि राहाता नगरपरिषदेच्या रणभूमीवर पडेल नवा ‘राजकीय नाट्याचा पडदा’.