राहाता नगराध्यक्षपदाची निवडणूक आता फक्त राजकीय नाही, तर विचारांची आणि दृष्टिकोनांची लढत बनली आहे. महायुतीकडून भाजपचे डॉ. स्वाधीन गाडेकर आणि महाविकास आघाडीकडून धनंजय गाडेकर हे दोन प्रभावी चेहरे आमनेसामने आले असून, या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
डॉ. स्वाधीन गाडेकर हे शिक्षण, तंत्रज्ञान आणि आधुनिक प्रशासनाच्या दिशेने विचार करणारे नवे नेतृत्व म्हणून समोर आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव, सामाजिक भान आणि सुशिक्षित दृष्टिकोन यामुळे त्यांची प्रतिमा “नव्या पिढीचा नेता” अशी निर्माण झाली आहे. त्यांची भाषा विकासाची, आरोग्याची आणि स्वच्छ प्रशासनाची आहे. ‘पारदर्शकतेतून प्रगती’ हा त्यांचा नारा नागरिकांच्या मनात घर करताना दिसतो.
दुसरीकडे, धनंजय गाडेकर हे पारंपरिक संघटन कौशल्य, गल्ल्यागल्ल्यातील संपर्क आणि जनाधार यावर आधारलेले अनुभवी नेते आहेत. त्यांची शैली साधी, पण जनतेशी थेट जोडलेली. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी आपली पकड घट्ट केली असून, जुने कार्यकर्ते आणि पारंपरिक मतदारवर्ग अजूनही त्यांच्याशी निष्ठावान आहे.
मात्र, या वेळी जनता निवडणूक वेगळ्या दृष्टीने पाहत आहे. शिक्षण, रोजगार, शहराचा विकास, वाहतूक, पाणी आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नांवर उत्तर हवे आहे. प्रचारातील दिखावा आणि आश्वासनांच्या पलीकडे जाऊन जनतेला आता परिणामकारक प्रशासनाची अपेक्षा आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. स्वाधीन गाडेकर यांचं सुशिक्षित नेतृत्व आणि आधुनिक दृष्टिकोन चर्चेचं केंद्र बनलं आहे. तर धनंजय गाडेकर यांचा अनुभव आणि लोकांमधली घनिष्ट नाळ हा त्यांचा मजबूत आधार आहे.
राहात्याची ही लढत म्हणजे नव्या विचारांचा उदय की पारंपरिक प्रभावाचं पुनरागमन, हे ठरवणारा निकाल ठरणार आहे. जनतेचा कौल कोणाकडे झुकेल हे सांगणं कठीण असलं तरी, एक गोष्ट स्पष्ट आहे राहाता शहराने या वेळेस दोन्ही हातात सोनं घेतलं आहे; कारण दोन्ही गाडेकर हे आपापल्या पद्धतीने शहराच्या भविष्याचा आराखडा मांडत आहेत.
राहात्याच्या जनतेच्या निर्णयावर आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. कारण या निवडणुकीचा निकाल केवळ नगराध्यक्षाचा नसेल, तर राहात्याच्या दिशेचा असेल