प्रभाग क्रमांक ८ मधील संगमनेरच्या स्थानिक राजकारणात आज एक भावनिक आणि महत्वाचा क्षण घडला नागरिकांच्या ठाम आग्रहावरून आसिफ शेख यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत रणांगणात अधिकृत प्रवेश केला.
गेल्या अनेक दशकांपासून प्रभागातील समस्या जशाच्या तशा उभ्या; पाणीपुरवठा असो, रस्ते-विकास असो, मूलभूत सुविधांचा प्रश्न असो. नागरिकांना आश्वासनांचे ढग मात्र वारंवार दिसले, पण पावसाचा एक थेंबही पडला नाही. या साऱ्याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये नाराजी, असंतोष आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘कोणीतरी आपलं म्हणावं’ या प्रतिनिधित्वाच्या भावनेची तीव्र कमतरता जाणवत होती.
याच पार्श्वभूमीवर प्रभागातील तरुण ते ज्येष्ठ नागरिक एकत्र आले, आणि त्यांनी एका नावामागे एकमत व्यक्त केलं-आसिफ शेख. समाजकार्यातून मिळवलेली ओळख, प्रामाणिकपणाची ख्याती व प्रभागातील प्रत्येक प्रश्नावर केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळेच शेख हे नाव लोकांच्या मनात ‘आवाज उठवणारा नेता’ म्हणून दृढ बसले.
नागरिकांनीच पुढाकार घेत शेख यांना उमेदवारीच्या मैदानात उतरवलं, ही गोष्ट प्रभागातील भावनांचा झरा स्पष्ट करते. कोणत्याही पक्षाच्या आधाराशिवाय, कोणतीही चकाकी नसताना, फक्त जनतेच्या विश्वासावर उभा राहून उमेदवारी अर्ज दाखल करणे हेच स्वतःमध्ये एक मोठं विधान आहे. हे प्रभाग क्रमांक ८ चं विद्रोही आणि स्वाभिमानी प्रतिक आहे.
या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ एक संदेश देत आहे “आमच्या प्रश्नांवर झाक घालणारा नव्हे, आवाज उठवणारा हवा!”
आसिफ शेख यांची उमेदवारी ही केवळ राजकीय लढत नाही; हा त्या नागरिकांचा संघर्ष आहे, ज्यांनी बदल स्वतःच्या हातात घेतला, ज्यांनी उमेदवाराला दिलेलं पाठबळ ‘जनतेचा प्रतिनिधी’ म्हणजे काय, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं.
प्रभाग क्रं ८ मधील ही लढत आता फक्त मतांची नाही ती विश्वासाची आहे, प्रश्नांची आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रभागाच्या भविष्याची आहे.