प्रभाग क्रमांक ८ हा फक्त क्रमांक नाही, हा परिवर्तनाचा प्रभाग म्हणून संपूर्ण शहरात ओळखला जातो. मोठमोठे दिग्गज, पक्षीय गणिते, पैशांचे साम्राज्य, या सगळ्यांना नागरिकांनी वारंवार पराभवाची धूळ चारली आहे. हा तोच प्रभाग ज्याने मागील निवडणुकीत विखे पाटलांचे उमेदवारच नाही तर थेट नगराध्यक्षपदाला मात दिली होती. त्यामुळे इथे नागरिक काय ठरवतात, कोणाला पाडतात आणि कोणाला उचलून धरतात हे कुणालाच अंदाज बांधता येत नाही.
पण याच अनिश्चितता आणि भीतीने का काय, यंदा एक वेगळंच राजकारण दिसत आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये चांगली पकड बांधून असलेला महाविकास आघाडीचा उमेदवार ‘अचानक’ विखे पाटलांच्या छत्राखाली आल्याची चर्चा रंगतेय. काका डावलून पुतण्या उचलण्याची वेळ विखे पाटलांवर आली कशी?
हे चित्र एकच गोष्ट विचारायला भाग पाडतं. विखे पाटलांकडे स्वतःचे सक्षम उमेदवार उरलेच नाहीत का? आपल्या घरच्या पंक्तीत ताकद नाही म्हणून आघाडीचा उमेदवार पळवण्याची वेळ आली का? ज्यांच्या नावाने तालुका उठतो-बसतो अशी प्रतिमा असणाऱ्या विखे पाटलांच्या राजकारणात ही एवढी पोकळी निर्माण झाली तरी कशी?
प्रभाग क्रमांक ८ मध्ये नागरिकांनी आजवर ‘बाहेरून आणलेल्या’ किंवा ‘जबरदस्ती लादलेल्या’ उमेदवारांना कधीच मान दिलेला नाही. मग अशा परिस्थितीत, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आघाडीचा उमेदवार हिरावून घेणे म्हणजे शहरातील विखे पाटलांच्या राजकारणातील असुरक्षितता तर नाही ना?
शेवटी, प्रश्न प्रभागाचा नाही हा प्रश्न प्रतिष्ठेचा आहे. प्रभाग क्रमांक ८ ने आजवर एका सत्ताकेंद्रालाही वचक दिला नाही. आणि आता “उचललेला उमेदवार” घेऊन नागरिक काय संदेश देणार? ते स्वतः विखे पाटलांपेक्षा जास्त चांगलं जाणतात.
वाट पाहायची फक्त निकालाची नाही. वाट पाहायची आहे प्रभाग क्रमांक ८ पुन्हा कोणाला धूळ चारतो ते पाहण्याची.