राहात्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा. विखे पाटलांच्या कळपात अचानक उभ्या राहिलेल्या बंडाचा व नाराजीचा भडका! ज्यांनी वर्षानुवर्षे विखे पाटलांना ‘देव’ मानलं, ‘गॉडफादर’ म्हटलं, त्यांच्या घरातलीच माणसं आज बंडाची मशाल हातात घेऊन रस्त्यावर उतरली आहेत. उमेदवारी ठरण्याच्या क्षणीच काही ‘विश्वस्त’ नाराजीने पेटले आणि सरळ अपक्ष अर्ज दाखल करत विखे पाटलांनी उभी केलेली समीकरणं उलथवण्याची तयारी दाखवली.
लोकांच्या टी-पॉईंटवर प्रश्न आता थेट असा उपस्थित होतो आहे. ज्यांनी आयुष्यभर निष्ठा ठेवली, त्यांनाच डावलून नव्याने उदयाला आलेल्या धनदांडग्यांना तिकीट का? प्रभागनिहाय कार्यकर्त्यांमध्ये खदखद उसळलेली आहे. निवडणूक जवळ येत असताना विखे पाटलांच्या पॅनलला बसणारा हा ‘अंतर्गत फटका’ किती मोठा असेल, याची कसोटी येत्या काही दिवसांत लागणार आहे.
२०१६ च्या निवडणुकीत जशी बंडखोरीने व नाराजीने अनेकांची समीकरणे कोसळवली होती, त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार का? नाराजीची धार आत आहे की बाहेर? अपक्ष म्हणून उतरलेले उमेदवार २१ तारखेला ठाम उभे राहतील का? की शेवटच्या क्षणी माघार घेतील? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर राहाता शहरातील राजकारणाचा पलडा पालटू शकतो.
आणि शेवटचा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न विखे पाटलांची राजकीय पकड, त्यांची दहशत, त्यांची ‘कमांड’ अजूनही टिकून आहे का? या सगळ्याला अंतिम शिक्कामोर्तब होणार २१ नोव्हेंबरला!
जनतेच्या मनात एकच मनोगत. लादलेले उमेदवार नकोत. आम्ही ठरवू कोण जिंकणार, कोण घरी बसणार!
शेवटी निर्णय पेटल्या राजकारणाचा नाही. निर्णय जनतेचा, आणि जनता कोणाला उचलते, कोणाला पाडते. तीच खरी कसोटी!